ठळक घडामोडी

कुडाळ परिसरात खून, मृतदेह फोंडा घाटात; पाच वर्षांनंतर खूनाचा पर्दाफाश!

मृतदेह व दुचाकी फोंडा घाटात फेकून अपघाताचा बनाव; चार संशयित आरोपी ताब्यात

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पाच वर्षांनंतर उलगडले मित्राच्या खुनाचे गूढ

मुंबई : संशयित आरोपींसह मुंबई पोलीस.

मुंबई / कणकवली : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ परिसरात पाच वर्षांपूर्वी झालेल्या मित्राच्या खुनाचा थरारक उलगडा करण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-७ पथकाला यश आले आहे. पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून मित्राची हत्या करून त्याचा मृतदेह व दुचाकी फोंडा घाटातील खोल दरीत फेकून अपघाताचा बनाव रचणाऱ्या चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कणकवली पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
       मिळालेल्या माहितीनुसार, अशपाक मुलाणी उर्फ निहाल (रा. माळशिरस, जि. सोलापूर) याचा पाच वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या वेळी हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-७ ला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनंतर या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर, अतिष भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी यांच्याकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी पैशांच्या वादातून संगनमत करून कुडाळ परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून मध्यरात्रीच्या सुमारास अशपाक मुलाणी याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व दुचाकी फोंडा घाटातील खोल दरीत फेकून अपघाताचा बनाव रचल्याचेही उघड झाले.
    या गुन्ह्यातील अन्य दोन साथीदार अमित राऊत आणि मनोज भंडारी यांचाही सहभाग समोर आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. याबाबतचा पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!