ठळक घडामोडी

तिलारी घाटातील महिलेच्या खूनप्रकरणाचा पर्दाफाश; कर्नाटकातील तिघांना अटक

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांची मोठी कारवाई; संशयितांकडून खुनाची कबुली

तिलारी जंगलात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी उकलले रहस्य

दोडामार्ग : प्रतिनिधी
       तिलारी घाट परिसरातील जंगलात आढळलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात कर्नाटकातील यल्लाप्पा महिलाप्पा करणावर (५७), बसवराज यल्लाप्पा करणावर (३३, दोघेही रा. राजकोटे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) आणि लगमाप्पा अंकलगी (३७, रा. केनवट्टी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी महिलेच्या खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत महिलेची ओळख गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी (२५, रा. वंटमोरी, जि. बेळगाव) अशी पटली आहे.
       मयत युवती आणि संशयितापैकी एका तरूणाचे प्रेमसंबंध होते. नंतर या दोघांचे ब्रेकपही झाले होते. ब्रेकअप नंतरही ही युवती त्या युवकाचे इतर युवतीशी लग्र होण्यास अटकाव करत होती. सोयरीक जुळत असेल तर त्यात मोडता घालत होती, असा समज संशयिताचा होता. त्यातून चिडून जावून तिथा खून झाला असावा असा पोलिसांचा संशय आहे.
       कोदाळी गावच्या हद्दीतील तिलारी घाटातील प्रेशर पॉईंटजवळ २९ मे २०२६ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात व्यक्तींनी कठीण वस्तूने डोक्यावर प्रहार करून महिलेचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके कार्यरत करण्यात आली. चंदगड पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला.
      पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचे छायाचित्र, अंगावरील कपडे, दागिने तसेच घटनास्थळावर मिळालेल्या वस्तूंच्या आधारे तपास करण्यात आला. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा आणि कर्नाटकातील बेपत्ता महिलांच्या नोंदी तपासण्यात आल्या. या प्रक्रियेत जवळपास दोनशे बेपत्ता महिलांच्या माहितीची छाननी करण्यात आली. तपासादरम्यान तिलारी घाटातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक क्रूझर वाहन संशयास्पदरीत्या ये-जा करताना आढळले. हे वाहन अल्पावधीतच पुन्हा घाटातून परतल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याचवेळी संबंधित वाहन अपघातग्रस्त झाल्याची माहितीही समोर आली. या धाग्याचा पाठपुरावा करताना पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले. दरम्यान, बेळगाव परिसरातील सीसीटीव्ही चित्रफितींमध्ये मृत महिला एका पल्सर मोटारसायकलवरून संशयितासोबत प्रवास करताना दिसून आली.
      पोलिसांनी बेळगाव ते हुबळी या मार्गावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून मोटारसायकलचा माग काढला. तांत्रिक विश्लेषणातून बसवराज करणावर याच्यापर्यंत तपास पोहोचला. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बसवराज हा आपल्या साथीदारांसह शिनोळी परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार रचलेल्या सापळ्यात तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गंगव्वा हिला तिलारी घाटात नेऊन खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पल्सर मोटारसायकलीसह संशयितांना पुढील कारवाईसाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, क्रूझर वाहनाचा चालक अपघातात जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू असून त्याचाही या प्रकरणाशी असलेला संबंध तपासला जात आहे.
      पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक विजय कोळेकर, शेष मोरे, अतिष म्हेत्रे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत खुनाचे गूढ उकलल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!