ठळक घडामोडी

कुडाळ येथे आग; वेळीच गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला!

अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात

भाडेकरू कुटुंबाचे सर्व साहित्य खाक; नागरिकांचे मदतकार्य

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजिकच्या वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोरील श्री.सामंत यांच्या घराच्या माडीवरील खोलीला अचानक आग लागून खोलीसह भाडेकरू श्री. नाईक कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह जीवनावश्यक साहित्य आगीत खाक झाले असून मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हि घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
      आगीची माहिती मिळताच नागरिकांनी कुडाळ नगरपंचायत व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाचारण केल्या. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. खोलीतील गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत लगतच्या खोलीलाही झळ बसली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. या घटनेने नाईक कुटूंबीयाना मोठा धक्का बसला आहे.

error: Content is protected !!