ठळक घडामोडी

सिंधुदुर्गातही एआय शेतीचे वारे; पिंगुळीच्या शेतकऱ्यांची आधुनिक शेतीची पाहणी!

पिंगुळीतील शेतकऱ्यांचा बारामती दौरा; ‘एआय शेतकरी’ संकल्पनेची घेतली माहीती

एआय, ड्रोन आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बारामती : येथे शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती घेताना पिंगुळीतील शेतकरी.

कुडाळ : प्रतिनिधी
     आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शेतीच्या नव्या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावाच्या शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे नुकताच अभ्यास दौरा केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक फायदेशीर, अचूक आणि जोखीममुक्त कशी करता येईल याबाबत शेतकऱ्यांनी तज्ञ अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. विशेष म्हणजे एआय मुळे भविष्यात शेतकरी नफा पक्का, धोका कमी या तत्वावर ‘डेटा’ ने शेती करेल. नांगरणीपेक्षा मोबाईल जास्त चालेल. शेतकऱ्यांनी एआय प्रणालीबरोबरच केंद्राने राबविलेल्या विविध उपक्रमांना भेट देऊन पाहणी केली.
    आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात शेती क्षेत्रात व आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल होत असतानाच आता एआय प्रणाली वापरून शेतकरी शेतीकडे वाटचाल करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मदतीने ऊस, भाजीपाला व फळे इत्यादी पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृषी विज्ञान केंद्र बारामती हे शेतकऱ्यांच्या शेतावरती प्रात्यक्षिके घेऊन मार्गदर्शन करत आहे. याचबरोबर ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यामार्फत जागतिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील शासकीय व खाजगी संस्थेसोबत करार करून वेगवेगळे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी राबवले जातात आधुनिक शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे तसेच शेतीतील विविध समस्याच्या अनुषंगाने भारतात पहिल्यांदाच के.व्ही.के.बारामती मध्ये आयोटी, मशीन, सेन्सर तंत्रज्ञान, ड्रोन इत्यादीचा वापर करून नवनवीन प्रयोग करीत आहे. या युगातील शेतकऱ्यांच्या शेतीला आधुनिक पद्धतीने योग्य दिशा व गती देण्यास प्रेरक करत आहे.शेतकरी मोबाईलच्या दुनियेत शेती क्षेत्रात प्रगतशील हवा या अनुषंगाने कृषी क्षेत्रात नंदनवन ठरलेल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयक विविध माहिती मिळाली सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचा धावता आढावा फिल्मच्या माध्यमातून दाखविण्यात आला. या केंद्रातील कृषीतज्ञ संतोष गोडसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.  या अभ्यास दौऱ्यात पिंगुळी येथील शेतकऱ्यांनी ऊस लागवड शेतकरी प्रगत तंत्रज्ञान देश विदेशातील विविध फळा फुलांच्या जाती, मधुमक्षिका पालन आदींची पाहणी केली.
     बीज प्रक्रिया केंद्र, बियाणे, भरड धान्य, भाजीपाला रोपे, ऊस रोपे,वनस्पती उती संवर्धन, जैविक खते, जैविक औषधे, जैविक किड नियंत्रण आणि रासायनिक घटक, मधुमक्षिका पालन प्रकल्प, सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी ,माती परीक्षण, शेती विषयक शेतकरी सहली, शेतकरी मेळावे पीक रोग अनुमान केंद्र, शारदा कृषी वाहिनी, फळ प्रक्रिया केंद्र पशुसंवर्धन विभागाकडे असलेल्या सेवा सुविधा, भाजीपाला गुणवंता केंद्र, मत्स्यबीजोत्पादन ,शेतकरी उत्पादन कंपनी स्थापना, संगणकाच्या साहाय्याने कृषी विस्तार ,कृषिक अँप, कृषिक  प्रात्यक्षिक युक्त कृषी प्रदर्शन, शेतीमधील होमिओपॅथी तंत्रज्ञान, भीमथडी जत्रा आधी विविध बाबत शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती देण्यात आली. या दौऱ्यात पिंगुळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मसके, जेष्ठ शेतकरी प्रमोद धुरी, जयवंत गावडे, पत्रकार अजय सावंत, महेश पालकर, अरुण सावंत, राजन पांचाळ, बापू पिंगुळकर, विठ्ठल राऊळ, नामदेव पिगुळकर, दिनकर सावंत, चिंतामणी सावंत, बाबाजी दळवी, सतीश धुरी, संदेश गावडे, गणेश शेटकर, प्रकाश सडवेलकर, निश्चय मसके, राजन मोर्ये, नरेंद्र बावलेकर, सोहम आकेरकर, सचिन गावडे, दशरथ सावंत आदी  प्रगतशील जेष्ठ शेतकऱ्यांसह युवा वर्गाचा सुद्धा समावेश होता.
       सिंधुदुर्गातही ‘एआय शेतकरी’कडे वाटचाल
     महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अलीकडेच कृषी विज्ञान केंद्र बारामतीला भेट देऊन एआय शेतकरी ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातही आधुनिक तंत्रज्ञानाधारित शेतीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
    मिळालेल्या ज्ञानाचा निश्चित उपयोग करू – महेश पालकर
     अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेले प्रगतशील शेतकरी महेश पालकर म्हणाले, “कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आधुनिक शेतीविषयी अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. विशेषतः एआय आधारित शेतीचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. भविष्यात या ज्ञानाचा उपयोग करून आमच्या भागातील शेती अधिक आधुनिक आणि फायदेशीर करण्याचा प्रयत्न करू.”

error: Content is protected !!