ठळक घडामोडी

वैभव नाईकांवरील एसीबी चौकशी राजकीय सूडबुद्धीतून; उबाठा शिवसेनेचा आरोप!

‘वेळ पडल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ’ ; अमरसेन सावंतांचा इशारा

वैभव नाईकांच्या पाठीशी शिवसैनिक खंबीर; कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे सेनेची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
         शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्याविरोधात शासकीय यंत्रणा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गैरवापर करून सुरू असलेल्या चौकशा या राजकीय सूडबुद्धीतून होत असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केला. पक्ष आणि शिवसैनिक वैभव नाईकांच्या खंबीरपणे पाठीशी आहेत. वेळ पडल्यास या कारवायांना “शिवसेना स्टाईल”ने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कुडाळ येथे आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
        श्री.सावंत पुढे म्हणाले, सन २०२२ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिवसेना पक्षातून अनेक जण फुटले. मात्र, वैभव नाईक यांनी शिवसेना (उबाठा) पक्ष व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. केवळ हाच एक राग मनात ठेवून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप श्री.सावंत यांनी केला आहे. २०२२ पासून वैभव नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर सातत्याने वेगवेगळ्या चौकशा लावल्या जात आहेत. एसीबीचे अधिकारी बदलले की नव्याने चौकशीचा बडगा उगारला जातो. आधीच्या चौकशांचे सर्व रेकॉर्ड फाईलवर उपलब्ध असताना, नवीन अधिकारी आल्यावर पुन्हा तीच चौकशी कोणत्या हेतूने सुरू केली जाते? असा संतप्त सवाल श्री. सावंत यांनी उपस्थित केला. तसेच वैभव नाईक हे कधीही कोणत्याही महामंडळावर किंवा मंत्रीपदावर नव्हते, त्यांचा व्यवसाय हा पूर्णपणे वडिलोपार्जित असून त्यातील सर्व आर्थिक उलाढाली कायदेशीर आहेत, असेही श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.
      महायुती सरकारवर टीका करताना श्री. सावंत म्हणाले की, सत्ताधारी पक्षात गेलेल्या अनेक नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अचानक गायब होतात, तर विरोधी पक्षातील निष्ठावंत नेत्यांना चौकशांच्या फेऱ्यात अडकवले जाते. हे सरकार दडपशाहीचे राजकारण करत असून महागाई, वाढते गॅस दर आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या १४ विकासकामांच्या भूमिपूजनाचा दाखला देत, मूळ कार्यकर्त्यांना डावलून ‘अ‍ॅडव्हान्स’ कामे करण्याचे आणि कामे विकण्याचे धंदे सध्या सत्ताधाऱ्यांकडून जोरदार सुरू असल्याचा आरोप यावेळी श्री. सावंत यांनी करत आ. निलेश राणे यांनी मालवणमधील भ्रष्टाचारावर घेतलेल्या आक्षेपांचा दाखला देत, त्यांनी आता स्वतःच्या कार्यकर्त्यांवर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर व सचिन कदम, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्वर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!