सागरी सुरक्षेला बळ; ६ सागरी पोलीस ठाण्यात मरीन होमगार्ड तैनात
किनारपट्टीवर संशयित हालचालींवर ठेवणार नजर; मरीन होमगार्डना विशेष प्रशिक्षण

कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन, मासेमारी, संवेदनशिल बंदरे या दृष्टीने सागरी सुरक्षेचे महत्व वाढलेले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पोलीस दलाच्या मदतीला ” मरीन होमगार्ड” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, निवती व वेंगुर्ला या ६ सागरी पोलीस ठाण्याच्या लॅन्डींग पॉईंट, बंदरे, सागरी किनारे व जेट्टी यासारख्या ठिकाणी बंदोबस्त करण्याकरीता जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टी भागात राहणारे व पोहता येणारे असे ६० स्थानिक होमगार्ड कर्मचारी यांना प्रत्येक सागरी पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी १० मरीन होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत.
या मरीन होमगार्ड यांना अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी भागात काम करण्याकरीता आवश्यक असलेली माहिती देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात सागरी सुरक्षेचे महत्व, किनारपट्टीचे निरीक्षण व दक्षता, संशयीत बोटी ओळखणे व बोर्डिंग ऑपरेशन, सागरी भागातील पेट्रोलिंग दरम्यान कर्तव्ये व जबाबदाऱ्या, वायरलेस कम्युनिकेशनचा वापर, नेव्हीगेशन व GPS बाबत मुलभुत माहिती, शोध व बचाव कार्य तसेच जेमिनी बोट व इंजिन माहिती, सायबर क्राईम बाबत प्राथमिक माहिती, आपत्ती व्यवस्थापन, गुप्तवार्ता संकलन, अग्नीशमन, किनाऱ्यावरील सुरक्षा बेवारस वस्तू हाताळणे, प्रथमोपचार व CPR देणे या महत्वाच्या विषयांवर दि.१० व दि.११ जून २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदरचे प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व ६० ” मरीन होमगार्ड” यांना अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या हस्ते प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असल्याबाबतचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांना आज दि.१२जून २०२६ रोजी ८ वाजता नेमलेल्या सागरी पोलीस ठाण्यामध्ये ड्युटीकरीता रवाना करण्यात आल्याची माहीती जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.









