‘हरित कुडाळ’साठी ठाकरे शिवसेनेचा उपक्रम; शनिवारी महालक्ष्मी मंदिर येथून मोहिमेचा शुभारंभ
वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम; नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात ५ हजार वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. कुडाळ शहर अधिक हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने ही मोहीम आयोजित करण्यात आली असून, भूजल पातळी वाढविणे आणि वाढते प्रदूषण रोखणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे, अशी माहीती ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिली.
या मोहिमेचा शुभारंभ उद्या शनिवार, १३ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील श्री देवी महालक्ष्मी मंदीर येथून होणार आहे. या उपक्रमांतर्गत बेल, आवळा, जरुळ, करंज, महोगनी, शेवगा, बहावा, चिंच, कुरुमी, कांचन आणि पळस यांसह विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक आणि निसर्गप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी केले आहे.









