विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप; पोषण आहाराची घेतली चाचणी
उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर अभ्यास करा; सभापती नाईकांचे विद्यार्थ्यांना आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. यावेळी सर्व शाळांमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार नवांगत विद्यार्थ्यांचे स्वागत-प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आले. सभापती मिलिंद नाईक यांनी तालुक्यातील जि.प.च्या आठ शाळांना भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत वारंगाची तुळसुली, मांडकुली, केरवडे, साळगाव, झाराप व पिंगुळी मधील प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण करण्यात आले. दुपारी सभापती श्री.नाईक यांनी जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव नंबर १ येथे भेट दिली. यावेळी शाळा समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष दिनेश साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन पवार, बाबाजी सावंत, केंद्रप्रमुख श्री.वारंग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गावडे, वैभव पवार व ग्रामस्थ पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या पोषण आहाराची सभापतींनी पाहणी केली. तसेच त्यांनी स्वतः पोषण आहाराचा आस्वाद घेत गुणवत्तेची तपासणी केली. या प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी सभापती श्री.नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत, भरपूर अभ्यास करून उज्ज्वल शैक्षणिक भविष्य घडवावे असे आवाहन केले.









