
कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी येथील ठेकेदारांचा समावेश; जिल्ह्यात खळबळ
सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून तपास सुरू
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जि. प. बांधकाम विभागाकडील बदलांवर बोगस सह्या करून बिले व अनामत रक्कम लाटण्याचा पराक्रम करणाऱ्या पाच ठेकेदारांवर अखेर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मोहन विद्याधर केळुस्कर (रा. कणकवली), ओंकार नंदकुमार पडते (रा. पडतेवाडी कुडाळ), ओंकार तुळशीराम पाताडे (रा. सुकळवाड, मालवण), मंदार आनंद दामोदर (रा. पडवे शिर्केवाडी) व लक्ष्मण शिवराम राऊळ (रा.कारिवडे सावंतवाडी) यांचा समावेश आहे. याबाबतची कायदेशीर तक्रार कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी पोलिसात दिली आहे. दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या सह्या करून काही कामांच्या बिलांच्या देयकाला, तर काही अनामत रकमांच्या देयकाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान कंत्राटदार मोहन केळुसकर यांच्या देवगड उप विभागातील साळशी देवणेवाडी रस्ता खडीकरण-डांबरीकरण कामाचे दुसरे तथा अंतिम देयक सहीसाठी बांधकाम विभागाकडे प्राप्त झाले होते. देयक व मोजमाप पुस्तिकेवर कार्यकारी अभियंता यांनी सही केल्यानंतर यापूर्वीच्या १४ ऑक्टोबर २०२५ रोजी अदा झालेल्या पहिल्या बिलावरील सही आपली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. तसेच त्या बनावट सहीने संबंधित कंत्राटदाराला ६ लाख ७६ हजार ५८८ रुपये अदा झाल्याचे निदर्शनास आले होते. त्या शिवाय २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीतील पूर्ण झालेल्या एकूण १० कामांच्या अनामत रकमा परत मिळण्याच्या संदर्भातील प्रस्तावावरील सह्या आपल्या सहीशी जुळत नसल्याचे कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आले होते. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी ही बाब उघड झाली होती. तर १० फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाकडील दोन कामांची देयके वित्त विभागाने सही जुळत नसल्याची त्रुटी काढून बांधकाम विभागाकडे परत पाठविली होती. दरम्यान सह्या जुळत नसलेली सर्व प्रकरणे पुढील कारवाईसाठी राखून ठेवत १६ फेब्रुवारी रोजी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या बाबतचा अहवाल कार्यकारी अभियंता यांनी दिला होता व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती.
जि. प. च्या सीईओंनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश
या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी याबाबत चौकशीअंती फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राजेंद्र सावंत यांना १८ मे २०२६ रोजी दिले होते. त्यानंतर आजपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने जिल्हाभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जि. प. पदाधिकारी यांनी या प्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर पालकमंत्री नीतेश राणे यांनी असे काम पुन्हा करताना संबंधितांच्या हाताला आधीच घाम येईल, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारत तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी १६ जून रोजी पोलिसात तक्रार दिली. संशयित आरोपींनी संगनमत करून ३० सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत देयके तयार करून त्यावर कार्यकारी अभियंता पदाचा शिक्का मारला. तसेच ओंकार पाताडे याने त्यावर आपली बनावट सही करून ती खरी असल्याचे भासवून १० लाख ४३ हजार ४४१ एवढी रक्कम बेकायदेशीररित्या मिळविण्याच्या उद्देशाने जि. प. कडे देयके सादर करून आपली व पर्यायाने शासनाची फसवणूक केली असल्याने पाचही संशयित आरोपीविरुद्ध आपली कायदेशीर तक्रार असल्याचे राजेंद्र सावंत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत तक्रार दाखल म्हटले आहे.
श्री.सावंत यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी संशयित दोषींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४०(२), ३(५) नुसार संगनमताने फसवणूक, मौल्यवान रोख्याचे बनावटीकरण करणे तसेच बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत, अशी माहीती देण्यात आली. या प्रकारानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.








