

कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडेत अपघात; दोघांना दुखापत
क्षणात घडला अपघात; दोन्ही वाहनांचे नुकसान
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे-महापुरुषवाडी येथे वॅगनार गाडीला सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अपघात झाला. चालत्या वॅगनार गाडीचा टायर अचानक फुटल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वॅगनार गाडी रस्त्याच्या विरूद्ध बाजूला जाऊन रस्त्यालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला समोरून आदळली. यात वॅगनार चालकाला दुखापत झाली असून, उपचारासाठी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पिंगुळीहून वेंगुर्लेच्या दिशेने वॅगनार गाडी जात होती. या गाडीतून तिघे जण प्रवास करीत होते. सदर वॅगनार वाडीवरवडे महापुरुषवाडी जवळ आली असता, गाडीचा टायर फुटला. त्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वॅगनार गाडी त्याच वेगात रस्त्याच्या विरूद्ध बाजूला जाऊन, तेथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला आदळली. यात वॅगनार चालकाला दुखापत झाली असून, आणखी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले.









