ठळक घडामोडी

कुडाळ मधील पीएम.श्री.जि.प.प्राथ. कुंभारवाडा शाळेचा प्रवेशोत्सव ठरला खास आकर्षण!

बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन; नवांगतांचे जल्लोषात स्वागत

जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

कुडाळ : प्रतिनिधी
       सिंधुदुर्गात उन्हाळी सुट्टीनंतर शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाले असून यावेळी सर्वत्र नवांगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथील पी.एम.श्री.जि.प.प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडा येथे आगळ्या वेगळ्या प्रकारे नवागतांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले.  सजविलेल्या बैलगाडीतून मुलांची प्रभातफेरी काढून नवागतांचे स्वागत करण्यात आले. या बैलगाडीतून मुले शाळेच्या ठिकाणी आली. त्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते मुलांचे औक्षण करून, फुल व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
     नासिर यांच्या सजवलेल्या बैलगाडीतून मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. मुलांच्याच बँड तालावर या बैलगाडीतून मुले शाळेच्या ठिकाणी आली. शिक्षक गुरुप्रसाद सावंत यांनी या बैलगाडीचे सारथ्य केले. त्यावेळी मुलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गट शिक्षणाधिकारी कैलास राऊत, नगरसेविका आफरीन करोल, नगरसेवक गणेश भोगटे आणि शिक्षकांनी औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनतर शाळेतील पहिले पाउल म्हणून कुंकुमजलामध्ये पाय बुडवून मुलांच्या पायाचे ठसे कागदावर घेण्यात आले. शाळेत प्रवेश केल्यावर मुलांनी श्री देवी सरस्वतीला नमस्कार करून आशीर्वाद देखील घेतले.
     श्री देवी केळबाई मंदिरच्या हॉलमध्ये प्रवेशोत्सवाचा मुख्य सोहळा संपन्न झाला. यावेळी जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, गट शिक्षणाधिकरी कैलास राऊत, नगरसेविका आफरीन करोल, नगरसेवक गणेश भोगटे, केंद्र प्रमुख महेश परुळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रद्धा देसाई, मुख्याध्यापिका सायली कदम, माजी मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत, गोविंद सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके संचाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सायली कदम, चैत्राली पाटील, ऋतुजा गावडे, स्वराली लाड, वंदना परब, गौरी गोसावी, दिपाली मोहिते, गुरुप्रसाद सावंत तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      श्री. खेबुडकर यांनी एकाच रंगाच्या गणवेशात असलेल्या प्रशालेच्या शिक्षक वृंदाचे विशेष कौतुक केले. सर्वांना सामान पातळीवर ठेवणारी हि फार मोठी संकल्पना असल्याचे त्यानी सांगितले. मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच जगण्याची कला शिकवा असे आवाहन त्यांनी पालक आणि शिक्षकांना केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जन्मदर राज्यात सगळ्यात कमी आहे. त्यामुळे पटसंख्या कमी होत चालली आहे. शाळा बंद पडू लागल्या आहेत. पण जे अतिरिक्त शिक्षक असतील त्यांना जिल्ह्यातच कसे सामावून घेता येईल याचा विचार प्रशासन करत आहे असे त्यांनी सांगितले. आज  शिक्षणमध्ये नावीन्य येत आहे. नवीन शैक्षणिक धोरण येते आहे. एआयचा वापर होऊ लागलाय. जग बदलते आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा काही गोष्टी शिकणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला जिल्हा आहे जो एआययुक्त जिल्हा आहे. अशा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा सीईओ म्हणून काम करताना अभिमान वाटतो, असे श्री. खेबुडकर म्हणाले. शिक्षक, पालक आणि मुलांनी तंत्रज्ञान अवगत करा. ते नाही केलं तर आपण पाठीमागे पडू अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
      यावेळी सेवानिवृत्त होऊनही प्रवेशोत्सवासाठी अपार मेहनत घेणाऱ्या या शाळेच्या निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत यांचा रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुलांना पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वाटप देखील शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले. शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक २ घेण्यात आला. स्वागत स्वप्नाली सावंत आणि इतर शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा गावडे यांनी केले. या प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्ताने नव्याने दाखल झालेल्या मुलांनी आपल्या विविध कला सादर केल्या.

error: Content is protected !!