ठळक घडामोडी

जि.प. बांधकाम विभागातील ‘त्या’ खोट्या सह्यांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आक्रमक!

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जि.प.वर धडक

दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा दालनातून हलणार नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या सह्यांद्वारे १३ कामांची बिले काढल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी ओरोस येथे जि.प. वर धडक दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हा दाखल होईपर्यंत दालनातून हलणार नसल्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला.
      यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आक्रमक भूमिका घेत, प्रशासनाला याप्रश्नी जाब विचारला. यावेळी संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, तसेच एवढा मोठा प्रकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय होऊ शकत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
     त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी यावेळी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी यासंदर्भात तीन वेळा पोलीस ठाण्यात भेट दिली होती. पोलिसांकडून काही आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याने प्रक्रिया विलंबित झाली. दरम्यान ते रजेवर गेले होते. मात्र आता ते हजर झाले असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
        या प्रकरणात विश्वासू कर्मचाऱ्याला लॉगिनची माहिती देण्यात आल्याने गैरप्रकार घडला असावा, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली. “कुणालाही वाचविण्याचा प्रश्न नाही. चौकशीत जेवढे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल,” असे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी स्पष्ट केले. तर संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दालन सोडले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या समवेत कुडाळचे प्रभारी तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, अनंत पिळणकर, रुपेश जाधव, उत्तम सरफदार आदी पदाधिकाऱ्यांनी खोट्या सही प्रकरणासह नळपाणी योजना, विद्यार्थी गणवेश वाटप, रस्ते, गटारे, विहिरी यांसारख्या विकासकामांतील कथित निकृष्ट दर्जा व अनियमिततांवरही जोरदार आवाज उठवला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत  अनंत पिळणकर, शिवाजी घोगळे, सचिन पाटकर, उत्तम सराफदार, रुपेश जाधव,  चंद्रकांत नाईक, नयन गावडे, देवेंद्र पिळणकर, उमेश राणे, महेश चव्हाण, अमित लाड, जगदीश तेंडुलकर, राजन वालावलकर, साबा पाटकर, नजीर शेख, रवींद्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
      दरम्यान राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनालाही तातडीने पाचारण करण्यात आले. अखेर संबंधित प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले. “भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!” अशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाची ठाम मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!