ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू – अमित सामंत यांचा इशारा
ग्रामसभांच्या विरोधाला डावलून मायनिंग परवानगी?; सखोल चौकशीची राष्ट्रवादीची मागणी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या मायनिंगविरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली आहे. तसेच ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे न घेतल्यास पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, वेंगुर्ले तालुक्यातील आजगाव, धाकोरे, आरवली, सोन्सुरे, मळेवाड, सखेखोल आणि आसोली या सात गावांतील ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला विरोध करत आहेत. ग्रामसभांच्या माध्यमातून सातत्याने विरोध नोंदवूनही प्रशासनाने संबंधित कंपनीला परवानगी दिली. हा निर्णय कोणाच्या राजकीय दबावाखाली घेण्यात आला, याची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच यामध्ये जे जे अधिकारी सहभागदार असतील त्यांना तात्काळ निलंबित करुन याप्रकरणी सखोल चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अमित सामंत यांनी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना संविधानाने एवढे अधिकार दिलेले आहेत. त्याचे उल्लंघन संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल तर ग्रामसभांचे स्तोम शासन स्तरावरून का माजवले जाते. जर ग्रामस्थांच्या निर्णय प्रक्रियेला किंमत नसेल शासनाने ग्रामसभांचे स्तोम बंद करावेत तसेच संबंधित मायनिंग कंपनीच्या माध्यमातून जे ड्रोन सर्वेक्षण करताना ज्याप्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांची नावे घेतल्याचा आरोप श्री.सामंत यांनी करीत त्या सत्ताधारी पक्षाने मायनिंग बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान त्यांनी दिले. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून अशा वादग्रस्त प्रकल्पांना खतपाणी घालून जिल्ह्या बाहेरील धनदांडगे आपल्या जिल्ह्यात आणून स्थानिक ग्रामस्थामध्ये संघर्ष व अशांतता निर्माण करून आपले इप्सित साध्य करू पाहणाऱ्यांना यापुढे स्थानिक ग्रामस्थ धडा शिकविल्या शिवाय राहणार नाहीत. हे उद्योग फक्त कालच्या प्रकरणापुरतेच मर्यादित नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक विनाशकारी प्रकल्प आणून सत्ताधारी आपली इप्सिते साध्य करण्यासाठी यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत आणि भविष्यातही होतील, त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम जनतेने यांना योग्य वेळी धडा शिकविण्याची गरज आहे तरच जिल्ह्यात प्रदूषित आणि धोकादायक प्रकल्प यापुढे आणण्याचे धाडस कोणी करणार नाही,अशा प्रकल्पांना विरोध करताना न्याय व शांततेच्या पद्धतीने करावा कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे निर्णय न घेता विरोध करावा. आताचे सत्ताधारी जिल्ह्याबाहेरील अशा लोकांना खतपाणी घालून स्थानिकावर गुन्हे कसे दाखल होतील याचीच वाट बघत असतात. सत्ताधाऱ्यांना फक्त पाच वर्षांतून एकदाच मतांसाठी आपली गरज आहे. यांचा विचार करावा, आणि शांततेच्या मार्गाने संघर्ष करावा,यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या सोबत आहे, असा विश्वास अमित सामंत यांनी ग्रामस्थांना दिला.
ग्रामस्थांवरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत! मायनिंग सर्वेक्षणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर संबंधित मायनिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत ही प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)पक्षाची असून जर लवकर गुन्हे मागे घेतले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)पक्षामार्फत आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल, असा गर्भित इशारा देऊन आजगाव दशक्रोशीतील गावातील ग्रामस्थां सोबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष खंबीरपणे पाठीशी राहील, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली आहे.









