अणाव येथील वयोवृद्ध महिलेला मिळाले घर
सरपंचांच्या आवाहनाला अनेकांचा प्रतिसाद
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील अणाव – जय भवानीनगर येथील मूकबधिर व वयोवृद्ध महिला श्रीमती शांता अणावकर यांचे घर काही दिवसांपूर्वी रात्री अचानक चिंचेचे मोठे झाड कोसळल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने घराची पुनर्बांधणी करणे त्यांच्या कुटुंबासाठी अशक्यप्राय होते. ही बाब अणाव गावचे सरपंच लिलाधर अणावकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेत मदतीचे आवाहन केले.
त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अनेक व्यक्तींनी आर्थिक व वस्तूरूपाने मदत केली. सर्वांच्या सहकार्यामुळे शांता अणावकर यांचे उद्ध्वस्त झालेले घर पुन्हा उभे राहिले. यानिमित्त शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या “स्वप्नपूर्तीचा आनंद सोहळा” कार्यक्रमात लाभार्थी कुटुंबाला मदतीचे साहित्य व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शांता अणावकर यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि डोळ्यांतील आनंदाश्रू उपस्थितांना भावूक करून गेले.
अमरसेन सावंत, जयभारत पालव, नारायण (आपा) मांजरेकर, अथर्व अणावकर, सुनिल कुलकर्णी, राजेश टंगसाळी, अविनाश अणावकर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज परब, कुणाल कीनळेकर यांच्यासह अनेकांनी या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. सर्वांच्या सहकार्यामुळे शांता अणावकर यांचे उद्ध्वस्त झालेले घर पुन्हा उभे राहिले. यानिमित्त शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या “स्वप्नपूर्तीचा आनंद सोहळा” कार्यक्रमात लाभार्थी कुटुंबाला मदतीचे साहित्य व शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी सरपंच लिलाधर अणावकर, माजी पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, माजी सरपंच नारायण (आपा) मांजरेकर, उपसरपंच सौ. आदिती अणावकर, सुनिल कुलकर्णी, राजेश टंगसाळी, शिवराम अणावकर, संदेश सावंत, अथर्व अणावकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर अणावकर, रवींद्र अणावकर, अविनाश अणावकर, सुरेश पवार तसेच जय भवानीनगर व अणाव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटाच्या काळात समाजाने एकजुटीने पुढे येत दिलेला हा मदतीचा हात म्हणजे माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरले आहे.









