शेती ते ग्रामविकासाचा अनुभव; छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या
आवळेगावात कृषी शिक्षणाची नवी दिशा; विद्यार्थिनी करणार ग्रामीण भागाचा अभ्यास
कुडाळ : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या कृषी कार्यानुभव कार्यक्रम (Rural Agricultural Work Experience – RAWE) अंतर्गत आवळेगाव येथे दाखल झाल्या असून, पुढील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत त्या गावामध्ये वास्तव्यास राहून शेती, ग्रामीण जीवन व ग्रामविकासाशी संबंधित विविध बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने कृषीकन्यांनी आवळेगाव ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे शुभेच्छा संदेश ग्रामपंचायतीस सुपूर्द करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. भेंडे, उपप्राचार्य लेफ्टनंट व्ही. व्ही. राणे, RAWE कार्यक्रम प्रभारी प्रा. व्ही. एम. खरात तसेच कृषी विस्तार विभागाचे प्रा. जी. डी. गायकी यांचे शुभेच्छा संदेशही ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सौ. पूर्वा सावंत यांनी कृषीकन्यांचे स्वागत करून ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील शेती पद्धती, प्रमुख पिके, विविध शासकीय योजना, ग्रामविकास उपक्रम व स्थानिक संसाधनांची सविस्तर माहिती कृषीकन्यांना देण्यात आली. बैठकीदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामीण विकासामधील लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच कृषीकन्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या उपक्रमामध्ये कु. विशाखा सूर्याजी, कु. दुर्गा मोडक, कु. किर्ती गुरव, कु. सायली धुरी आणि कु. सृष्टी बोले या कृषीकन्या सहभागी असून, त्या आपल्या वास्तव्यात गावातील शेतकरी, शेती व्यवस्थापन, पीक उत्पादन, कृषी विस्तार कार्य, महिला बचतगट, युवक सहभाग तसेच ग्रामीण विकासाच्या विविध घटकांचा सखोल अभ्यास करणार आहेत.
RAWE कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व कृषीविषयक परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होणार असून, त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात तसेच नेतृत्व, संवादकौशल्य व सामाजिक बांधिलकीच्या विकासात मोलाची भर पडणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.









