ठळक घडामोडी

‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ १२ जुलैला; ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉपची उपस्थिती!

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, टीम कुडाळ मान्सून रनचा पुढाकार; केनियाचा स्टार धावपटू सहभागी होणार

निरोगी जीवनाचा संदेश देणा-या ‘कुडाळ मॉन्सून रन’चे यंदाचे ३ रे वर्ष

कुडाळ : प्रतिनिधी
      शरीर आणि मन यांच्यातील संतुलन उत्तम राखण्यासाठी आजच्या व्यस्त दिनक्रमात व्यायामाला अग्रक्रम देणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि याच कल्पनेतून नागरिकांमध्ये चालणे, धावणे आणि निरोगी राहण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यंदाही ‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रेंटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ५.३० वाजता या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण यशासह हा उपक्रम तिसऱ्या वर्षात वाटचाल करत आहे, अशी माहीती टीम मान्सून रनचे डाॅ.जी.टी.राणे यांनी कुडाळ येथे आज पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे केनया देशातून “इंटरनॅशनल वर्ल्ड मॅरेथॉन विनर व ऑलिम्पिक चॅम्पियन” विल्सन किप्राॅप या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      कुडाळ येथील हाॅटेल स्पाइस कोकण येथे बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.डाॅ.प्रशांत सामंत, गजानन कांदळगावकर, डाॅ.जयसिंह रावराणे, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, साईराज जाधव, मकरंद नाईक, बंड्या सावंत आदी उपस्थित होते.
     डाॅ.राणे म्हणाले, देशाची खरी संपत्ती म्हणजे तिथली निरोगी जनता. याच विचाराने ३ वर्षांपूर्वी ‘राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर’ने एका मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली. समाज निरोगी आणि आनंदी असावा, यासाठी आमची संपूर्ण टीम अविरत प्रयत्नशील आहे. कारण, सुदृढ नागरिकच एका ‘सशक्त राष्ट्राचा’ भक्कम पाया असतात. मागील दोन वर्षातील मॅरेथॉन स्पर्धा शिस्तबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. २०२४ मधील ७५० आणि २०२५ मधील १३५० धावपटूंचा वाढता प्रतिसाद, हे आपल्या यशाचे गमक आहे. याच शानदार यशाची दखल घेत ‘मुंबई रोड रनर्स’ने आपल्या स्पर्धेला ‘Best Rated Half Marathon of The Year 2024’ चा मानाचा पुरस्कार दिला आहे.
    आज आपली स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून, परदेशी स्पर्धकही यात सहभागी होत आहेत. यावर्षी स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे केनया देशातून “इंटरनॅशनल वर्ल्ड मॅरेथॉन विनर व ऑलिम्पिक चॅम्पियन” विल्सन किप्राॅप या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. आपल्याला त्यांच्याबरोबर भाग घेण्याची व धावण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल, डिजिटल सर्टिफिकेट व तसेच प्रत्येक गटामधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येते. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट देखील दिले जाणार आहे. सदर मॅरेथॉन बॅ. नाथ पै विद्यालय, एम.आय.डी.सी, कुडाळ येथून सुरू होऊन नेरूर मार्गे वालावल श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथील नदीकाठी जाऊन पुन्हा बॅ. नाथ पै विद्यालय, एम.आय.डी.सी, कुडाळ येथे येऊन संपणार आहे. ही स्पर्धा ५ किमी, १० किमी, १६ किमी व २१ किमी या अंतरासाठी घेतली जाणार असून वयोगट तयार करून त्याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहीती डाॅ.जी.टी.राणे यांनी दिली.
     गजानन कांदळगावकर म्हणाले, मागील दोन वर्षातील कुडाळ मान्सून रन या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही मोठी नोंदणी झाली आहे. भविष्यात ही मोठी मॅरेथॉन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    डाॅ.सामंत म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक मोहन दहीकर यांच्यासह अनेक मान्यवर मॅरेथॉनच्या उदघाटन कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. डाॅ.जयसिंग रावराणे यांनी या मॅरेथॉनची संकल्पना विषद केली.

error: Content is protected !!