ठळक घडामोडी

कुडाळ पंचायत समितीत PWD चा ‘कार’भार चव्हाट्यावर!

‘माणगाव तिठा ते बाजार रस्त्यावर पाणी साचल्यास अधिकाऱ्यांना पाण्यातच बसवणार; पं.स.सभा गाजली

निकृष्ट कामांची पोलखोल करण्यासाठी सभापती स्वतः मैदानात उतरणार

कुडाळ : प्रतिनिधी
         प्रत्यक्ष जमिनीवर काम शून्य, पण कागदावर मात्र लाखांची बिले! हाच अजब कारभार कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सुरू असल्याचा खळबळजनक पर्दाफाश पंचायत समितीच्या मासिक सभेत झाला. ठेकेदारांची मनमानी, अर्धवट ठेवून पळून गेलेली कामे आणि अधिकाऱ्यांची मूक संमती यावरून संतप्त लोकप्रतिनिधींनी सभागृह डोक्यावर घेतले. “काम न करताच देयके लाटण्याचा हा कोणता पॅटर्न?” असा जाब विचारत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने, अखेर सभापतींना स्वतः रस्त्यांच्या ‘स्पॉट व्हिजिट’ची घोषणा करावी लागली.
          कुडाळ पंचायत समितीची सभा सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उपसभापती सीताराम तेली, प्रभारी गटविकास अधिकारी मनोज भोगटे यांसह  सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.
      कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संशयास्पद, निकृष्ट आणि गलथान कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढण्यात आले. २५ टक्के ‘बिलो (कमी दराने) निविदा भरून ठेकेदार कामे कशी काय पूर्ण करतात? या ठेकेदारांना हे परवडतेच कसे? की काम न करताच देयके लाटली जात आहेत? असा संतप्त सवाल सदस्य मंगेश प्रभू यांनी उपस्थित करत  बांधकाम विभागाचे उपअभियंता धीरज पिसाळ यांना पुरते धारेवर धरले. अधिकारी प्रत्यक्ष जागेवर न जाता केवळ ‘कार’मधून फिरून कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप करत, येत्या पावसाळ्यात माणगाव तिठा ते बाजार रस्त्यावर पाणी साचले, तर बांधकामच्या अधिकाऱ्यांना त्याच पाण्यात बसवू असा थेट इशारा सदस्य योगेश धुरी यांनी दिला.
           पिंगुळी पाट या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७ लाख १७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे काम एका ठेकेदाराने २५ टक्के बिलोने घेतले होते. आमच्या माहितीप्रमाणे या ठिकाणी प्रत्यक्ष काहीच काम झालेले नाही, तरीही इथे देयक मंजूर करण्याचा घाट घातला जात आहे, असा खळबळजनक आरोप सदस्य मंगेश प्रभू यांनी केला. यावर उपस्थित उपअभियंता धीरज पिसाळ यांनी, सदर रस्त्याचे काम झाले आहे, मात्र अद्याप देयक (पेमेंट) दिलेले नाही,अशी सारवासारव केली. त्यावर प्रभू यांनी सभापतींना या कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची विनंती केली. याची गंभीर दखल घेत सभापती मिलिंद नाईक यांनी, आपण स्वतः या कामांची ‘स्पॉट व्हिजिट’ करू, अशी ग्वाही दिली.
      बांधकाम विभागाच्या कारभारावर उपसभापती सीताराम तेली यांनीही जोरदार प्रहार केला. बांधकाम विभागातील अधिकारी स्वतःच कामे करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत,२५ टक्क्यांनी कमी दरात कामे कशी काय होऊ शकतात? आम्ही अशा ठेकेदारांची तातडीने बैठक घेणार आहोत. जर ही कामे निकृष्ट दर्जाची किंवा बोगस असतील, तर ही बाब फार गंभीर आहे,अशा शब्दांत तेली यांनी श्री पिसाळ यांना सुनावले.
       पिंगुळी पाट रस्त्यावर माड्याचीवाडी येथे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेली अनधिकृत पोलीस चौकीची शेड हटवण्याबाबत गेल्या दोन मीटिंगमध्ये चर्चा होऊनही कारवाई झाली नव्हती. आमचा तपासणी नाक्याला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीचे बांधकाम पीडब्ल्यूडी विभाग मान्य करत असतानाही ती शेड का हटवली जात नाही? असा सवाल मंगेश प्रभू यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला. अखेर उपअभियंता धीरज पिसाळ यांनी संबंधितांना नोटीस दिली असून, येत्या ७ दिवसांत ही शेड हटवली जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली.
        कुडाळ तालुक्यातील घावनळे हरिजनवाडी येथील शाळा इमारतीचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवले असून तो तिथून पसार झाला आहे. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत २० पटसंख्या आहे, याकडे अर्चना घावणळकर यांनी लक्ष वेधले. तर तालुक्यात अनेक ठिकाणी दलित वस्ती’ची कामे का झाली नाहीत? असा सवाल करुणा पावसकर यांनी उपस्थित केला. यावर उपस्थित बांधकाम अधिकारी  टेमकर  यांनी माहिती घेऊन सांगतो असे उत्तर देत नेहमीप्रमाणे वेळ मारून नेली. घोडगे जांभवडे भागात रस्त्याच्या साईड पट्टीवर नियमबाह्य झाडे लावल्याचा आरोपही सदस्य श्री.मडव यांनी केला, तर आकेरी ते माणगाव रस्त्यावरील ११ लाख रुपयांच्या दुरुस्ती खर्चावर योगेश धुरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
        माणगाव-कांदुळी मार्गे मोरे एसटी बस का सोडली जात नाही? तुम्ही पगार घेता तर मग कामे का करत नाही? असा सवाल योगेश धुरी यांनी केला. तर पणदूर विद्यालयात जाणाऱ्या शाळकरी मुलांशी एसटीचे चालक-वाहक उद्धटपणे वागतात आणि गाड्या थांबवत नाहीत, याकडे करुणा पावसकर यांनी लक्ष वेधले. यावर, ५२ चालक कमी असल्याने २० ते २२ जणांना ‘डबल ड्युटी’ लावावी लागते, अशी कबुली एसटी अधिकाऱ्याने दिली. कसाल बस स्थानकातील कचऱ्याच्या साम्राज्यावरून संतोष कांदळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अंगणवाड्यांना पुरवला जाणारा पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा गंभीर आरोप श्रीमती घावणळकर यांनी केला. त्यावर, सभापती नाईक यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दुपारनंतर अंगणवाड्यांना अचानक भेटी देण्याचे आदेश दिले. ८ शाळांच्या कामांना वर्कऑर्डर देऊनही कामे सुरू झाली नाहीत, यावरही चर्चा झाली.कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्लेखनाचा प्रस्ताव प्रलंबित असताना तिथे १० लाख रुपये खर्चून केलेले काम बोगस असून त्याचे पेमेंट रोखावे, अशी मागणी संतोष कांदळकर यांनी केली.

error: Content is protected !!