योगाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनशैलीचा संदेश; योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग

कुडाळ : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दि. २१ जून रोजी माड्याचीवाडी येथे श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित योगशाळेत उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना योगाभ्यास करण्याची संधी मिळाली तसेच योगाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महंत गावडे काका महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीतून योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवनातील महत्त्व विशद केले. योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा पाया असून प्रत्येकाने नियमित योगाभ्यास अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. आजपर्यंत गावडे काका महाराज व भक्त सेवा न्यास यांच्या माध्यमातून १०० हून अधिक योगशिक्षक समाजाला घडविण्यात आले असून ते विविध ठिकाणी योगाचा प्रसार करत समाजसेवेचे कार्य बजावत आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिन अधिकृतपणे घोषित होण्यापूर्वीच गेली तीन वर्षे २१ जून या वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाच्या औचित्याने गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गांचे आयोजन करण्यात येत होते. विशेष म्हणजे याच दिवसाला पुढे आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता मिळाली.
यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगशिक्षक श्री. आनंद सावंत यांनी योगासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करत विविध योगासने व प्राणायामाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमास श्री. सुजय गावडे, सौ. श्वेता कोरगावकर (माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी भाजपा सिंधुदुर्ग), माजी सभापती कुडाळ पंचायत समिती तथा भाजप तालुकाध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. बंड्या सावंत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. राजू राऊळ, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. अदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा महिला तालुकाध्यक्ष कुडाळ सौ. आरती पाटील, पंचायत समिती सदस्य श्री. मंगेश प्रभू, नगरसेवक श्री. उदय मांजरेकर, नगरसेविका सौ. श्रेया गावंडे, श्री. राजू गावंडे तसेच भक्त सेवा न्यास, माडायाचीवाडीचे योगसाधक व योगशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून योगाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.










