ठळक घडामोडी

नापत्ता महिलेचा शोध घेण्यात कुडाळ पोलिसांना यश!

‘ऑपरेशन सर्च’ मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरी

कुडाळ : प्रतिनिधी
       राज्यातील नापत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन सर्च’ मोहिमेंतर्गत कुडाळ पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या नापत्ता नोंद असलेल्या तालुक्यातील एका विवाहित महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. ही मोहिम कुडाळचे सहा. पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
     कुडाळ तालुक्यातील महामार्गावरील एका गावातील सदर महिला गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाली होती. याबाबत कुडाळ पोलिसांत नापत्ताची नोंद करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास सुरू असताना कुडाळ पोलिसांनी विविध स्तरांवर कसून चौकशी केली. तपासादरम्यान संबंधित महिला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील एका गावात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहा. पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव व पोलीस शिपाई संदीप वराडकर यांच्या पथकाला तातडीने कोल्हापूर येथे रवाना करण्यात आले.
    पोलिस पथकाने सदर ठिकाणी जाऊन संबंधित महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी कुडाळ पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान महिलेने घरगुती कारणावरून आपण स्वतःहून घर सोडून गेल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली. दरम्यान नापत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन सर्च’ मोहिमेंतर्गत कुडाळ पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कार्यवाहीचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!