राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.अमितजी सामंत वाढदिवस विशेष

सिंधुदुर्गच्या राजकीय मातीने महाराष्ट्राला नेहमीच दिग्गज आणि धडाडीचे नेते दिले. इथलं राजकारण कधी समाजवाद्यांच्या प्रभावाखाली राहिलं, कधी काँग्रेसचा गड बनलं, तर कधी शिवसेनेच्या झंझावातात राहिलं. अगदी अलीकडच्या काळात तर इथल्या राजकीय समीकरणांनी कित्येक कोलांटउड्या घेतल्या. पण, तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा सर्वात मोठं वादळ आलं आणि पक्षांची छिन्नविच्छिन्न अवस्था झाली, तेव्हा सिंधुदुर्गच्या भूमीत एक तरुण नेतृत्व शांतपणे पण तितक्याच खंबीरपणे उभं होतं. ते नेतृत्व म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत! आज रविवार दि. २१ जून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या ‘निष्ठावंत’ प्रवासाचा घेतलेला हा वेध…
श्री.अमित सामंत यांचा राजकीय प्रवास कोणा गॉडफादरमुळे सुरू झालेला नाही. एनएसयुआय च्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावरून थेट जमिनीवर काम करत त्यांनी आपल्या नेतृत्वाची पाळेमुळे घट्ट केली. आज ते ज्या पदावर आहेत, ते त्यांच्या अविरत संघर्षाचे आणि पक्षनिष्ठेचे फळ आहे. अनेक नेते आले आणि गेले, पण शरद पवार या नावावर आणि विचारावर श्रद्धा ठेवून सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचा गड शाबूत ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान अमितजींनी लीलया पेलले.
आजच्या डिजिटल युगात जिथे छोट्याशा कामाचेही मोठे फ्लेक्स लावले जातात, तिथे अमित सामंत हे ‘प्रसिद्धीपासून चार हात दूर’ राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. ते गाजावाजा करत नाहीत, तर थेट काम करतात,आरोग्य प्रश्नी तर ते अधिक तत्परतेने काम करतात.
कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात कोविड सेंटर उभे करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जेव्हा महापुराचे संकट आले, तेव्हा स्वतःच्या हाताने गव्हाच्या पोत्यांची वाहतूक करून पूरग्रस्तांच्या घराघरांपर्यंत मदत पोहोचवणारे अमित सामंत हेच होते.शिक्षण, आरोग्य, आरटीओ मधील गैरप्रकार असो की कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे.अशी त्यांची ओळख आहे. अमित सामंत हे कुणावरही चिखलफेक करणारे किंवा वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे नेते नाहीत. त्यांच्याकडे विरोधी पक्षातील नेत्यांचाही एक वेगळा आदर आहे. राजकारणात ‘निष्ठा’ आणि ‘संयम’ काय असतो, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. मोठ्या नेत्यांशी असलेले उत्तम संबंध आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेली नाळ, या दोन्ही गोष्टींचा मेळ त्यांनी अचूक साधला आहे.
जिल्ह्यात कितीही राजकीय भूकंप झाले, तरी अमित सामंत यांनी जोडलेला कार्यकर्ता आज तसूभरही मागे हटलेला नाही. शरद पवार साहेबांच्या विचारांची तुतारी घेऊन ही सर्व फळी अमितजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.वादळाशी दोन हात करत, पक्षात नवे चैतन्य फुंकणाऱ्या अशा या संयमी आणि निष्ठावंत नेतृत्वाला वाढदिवसाच्या आणि पुढील राजकीय वाटचालीस अनंत शुभेच्छा!









