ठळक घडामोडी

कुडाळात खळबळ! नव्याने सुरू झालेल्या ‘आपला बाजार’वर FDAची कडक कारवाई!

मोठ्या गाजावाजात उदघाटन; पण दोन दिवसांतच FDAचा दणका

वैध परवाना नसल्याने व्यवसाय बंदची FDA ची नोटीस

कुडाळ : प्रतिनिधी
        प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या चार दिवसांपूर्वी (१७ जून) मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी धाड टाकली.  आपला बाजार कडे काही परवाने नसल्याने त्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अशी माहिती आज शनिवारी अन्न आणि औषध प्रशासनाचे कुडाळ-वेंगुर्लेचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
     अवघ्या चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या आपला बाजार या स्टोअवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी सायंकाळी धाड टाकल्याने कुडाळ शहरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत आज ज्यांनी या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला ते अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. अभय चंदनशिवे म्हणाले, एकाच्या तक्रारी वरून ही कारवाई करण्यात आली. त्यात  हे भव्य स्टोअर  FDA चे कोणताही वैध FSSAI अन्न परवाना  नसताना बेकायदेशीरपणे सुरू होते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
  श्री. चंदनशिवे हे माहिती मिळताच स्वतः आणि त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री। गावित अशा दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने ‘आपला बाजार’ स्टोअरमध्ये प्रत्यक्ष तपासणी केली.
      या तपासणीदरम्यान स्टोअरचे मालक श्री. नाईक उपस्थित नव्हते आणि त्यांनी आपली पूर्ण माहितीही डिस्प्ले केली नव्हती. त्यामुळे घटनास्थळी हजर असलेले स्टोअर मॅनेजर अमोल सुतार यांच्या उपस्थितीतच सर्व कायदेशीर कारवाई पार पाडण्यात आली आणि त्यांच्याच नावे कलम 31 नुसार व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.
    श्री. चंदनशिवे पुढे म्हणाले, नियमानुसार ज्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर दीड कोटी रुपयांच्या वर असतो, त्यांना FDA कडून FSSAI चा ‘व्हॅलिड परवाना’ घेणे अत्यंत बंधनकारक आहे. या स्टोअरच्या सांगण्यानुसार त्यांचा वार्षिक व्यवसाय दीड कोटीच्या वर जाणार होता, असे असूनही त्यांनी परवाना घेतला नव्हता. विनापरवाना अन्न व्यवसाय सुरू ठेवणे हा अन्न सुरक्षा कायदा कलम ३१ नुसार गंभीर गुन्हा असून, कलम ६३ नुसार तो शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे FDA च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ‘व्यवसाय बंद’ करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत वैध FSSAI लायसन्स मिळत नाही, तोपर्यंत स्टोअर उघडता येणार नाही.
    केवळ परवान्याचीच नव्हे, तर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत FDA अधिकाऱ्यांनी स्टोअरमधील गुळाच्या साठ्यातून संशयावरून नमुने जप्त केले आहेत. हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच येणार आहे.
   अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या स्टोअरला आता ऑनलाईन अर्ज करून FDA च्या वरिष्ठ कार्यालयाकडून अप्रूव्हल घ्यावे लागेल. जर त्यांच्या अर्जात किंवा स्टोअरमध्ये काही त्रुटी असतील, तर त्या त्यांना पूर्ण कराव्या लागतील. संपूर्ण तपासणी होऊन जोपर्यंत वैध FSSAI लायसन्स ग्रॅंड (मंजूर) केले जात नाही, तोपर्यंत त्यांना व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. तसेच भविष्यात ग्राहकांकडून कोणत्याही दुकानाबाबत तक्रार किंवा संशय आल्यास, तिथेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असे श्री. चंदनशिवे यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!