ठळक घडामोडी

आंबडपाल येथे उद्या जिल्हास्तरीय ‘कृषी दिन’ व भव्य शेतकरी मेळावा!

सिंधुदुर्ग जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांची माहीती

‘अल् निनो’सह आधुनिक शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
        महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी देखील सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने, पालकमंत्री आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय आणि जिल्ह्याचा मुख्य जिल्हास्तरीय कृषी दिन व भव्य शेतकरी मेळावा कुडाळ तालुक्यातील आंबडपाल येथे सोमवार, १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होईल, असे जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले.
      सिंधुदुर्गनगरी येथे जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या दालनात सोमवारी (२९ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री.साईल बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण समिती सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर आदी उपस्थित होते.
    अल् निनो’चे संकट आणि आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष भर!
         यावेळी श्री. साईल म्हणाले की,यावर्षीच्या शेतकरी मेळाव्यात पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत, सध्याच्या बदलत्या हवामानावर विशेष भर देण्यात आला आहे.बदलत्या नैसर्गिक वातावरणामुळे आणि ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे शेतीवर होणारे परिणाम, तसेच लांबलेल्या पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान यावर कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना सखोल व तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचे प्रदर्शन भरवले जाणार असून, त्यात पारंपरिक व आधुनिक शेती अवजारांचे विक्री केंद्र आकर्षण ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी आधुनिक भातशेतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले जाईल, तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभही यादरम्यान केला जाणार असल्याचे श्री. साईल यांनी सांगितले.
    कोकणातील शेतकऱ्यांसाठी २१० कोटींची भरपाई; सिंधुदुर्गाला ८० कोटी!
        सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश आले असून, राज्य शासनाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुमारे २१० कोटी रुपयांची भरीव नुकसान भरपाई मंजूर केली आहे. या एकूण निधीपैकी तब्बल ८० कोटी रुपये एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वर्ग करण्यात आले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला असून, लवकरच विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.आ. निलेश राणे यांनी विधिमंडळ आणि विधानसभेत हा प्रश्न अत्यंत अभ्यासूपणे आणि हिरीरीने लावून धरला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदारांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी मंजूर झाला आहे, असे ते म्हणाले.
    शिक्षण क्षेत्रातील रेंगाळलेले प्रश्न मार्गी-सीईओ
       मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर म्हणाले की,जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केंद्र प्रमुख पदोन्नती आणि शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे, जिल्ह्यात ६९ शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली असून उर्वरित ६९ शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पुढील १५ दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत,यामधील दिव्यांग प्रवर्गातील ३ प्रस्ताव अपात्र ठरले असल्याचे सांगत  चट्टोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार १२ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या १७९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करून त्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत, असे सांगितले.

error: Content is protected !!