
मावळते अध्यक्ष राजीव पवार यांची माहीती; रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार सुनिती नाईक यांना जाहीर
रक्तदान, वृक्षारोपण ते डायलेसिस युनिटनंतर नव्या वर्षातही सेवा उपक्रमांना गती – मकरंद नाईक
कुडाळ : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण सोहळा बुधवार दि.१ जुलै रोजी सायं.७ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नूतन अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश म्हाडदळकर, खजिनदार डॉ. जयश्री केसरे आदी पदाधिकारी यांना पदग्रहित केले जाणार असल्याची माहिती आज हॉटेल स्पाईस कोकण येथे आयोजित पत्रकार परिषदेत मावळते अध्यक्ष राजीव पवार यांनी दिली. सदर पदग्रहण सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७२ चे DGND प्रसिद्ध डोळ्यांचे डॉ. सुहास जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रो. मकरंद नाईक, रो. राकेश म्हाडदळकर, डाॅ.जयश्री केसरे, रो. राजन बोभाटे, रो. गजानन कांदळगावकर, रो. रूपेश तेली, रो. प्रणय तेली, डॉ. जयश्री केसरे, रो. अॅड. राजीव बिले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
२०२५-२६ रोटरी वर्षात कुडाळमध्ये भरगच्च उपक्रम यशस्वी – राजीव पवार
गेल्या वर्षभरात रोटरी क्लब ऑफ कुडाळने विविध दर्जेदार उपक्रम रक्तदान शिबीर, हाफ मॅराथॉन, इन्स्पायर सायकल, शैक्षणिक अॅप, १० हजार वृक्षारोपण, डायलेसिस युनिट, आरोग्य शिबीर, १०० सायकल वाटप, रोटरी फूड फेस्टिव्हल आदी विविध उपक्रम यशस्वी करताना सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मावळते अध्यक्ष राजीव पवार यांनी आभार व्यक्त केले,
शैक्षणिक, आरोग्य व गरजू व्यक्तिंसाठी विविध उपक्रम राबविणार – नूतन अध्यक्ष रो. मकरंद नाईक
२०२६-२७ या नविन रोटरी वर्षात ३३ वा अध्यक्ष म्हणून विविध शैक्षणिक, आरोग्य विषयक व समाजातील गरजू व्यक्तिंना उपक्रम राबविणार असल्याचा मनोदय नूतन अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी व्यक्त केला. डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल रो. डॉ. लेनी डिकोस्टा (गोवा) व उपप्रांतपाल रो. संजय रावराणे यांचे मार्गदर्शनाखाली मैत्री आणि सेवा या रोटरीच्या ब्रीदाप्रमाणे सर्वांना सोबत घेवून काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी सांगितले.
पदग्रहण सोहळ्यात रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार २०२६ वितरित होणार
वार्षिक पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून कै. सौ. राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृती रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार २०२६ चे वितरण केले जाणार आहे. यासाठी श्री कलेश्वर माध्यमिक विद्यालय नेरूरच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिती शेखर नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून श्री लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुळसुली इयत्ता ८ वी मध्ये शिकणारी होतकरू आणि गरजू विद्यार्थिनी कु. सोनिया आनंद झोरे, रा. घावनळे-खोचरेवाडी हिला पुढे शिक्षणासाठी रोख ५००० रू. आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.
गुणवंत रोटरी सदस्य व पाल्यांचा सन्मान
रोटरी सदस्यांच्या दहावी, बारावी, पदवी, विविध स्तरावर गुणवंत पाल्यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रामध्ये यश संपादन करणाऱ्या रोटरी सदस्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.
रोटरी उत्कृष्ट व्यवसायिकता पुरस्कार
या वर्षी रोटरी उत्कृष्ट व्यवसायिकता पुरस्कारसाठी घावनळे खुटवळवाडीचे साई ओमकार डेकोरेटरचे श्री. कृष्णा लक्ष्मण बिले यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रकाशित होणारे रोटरी सिंधुरत्न बुलेटीन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केले जाणार आहे. संपादक ज्येष्ठ रोटरी सदस्य काशिनाथ सामंत सर यांचे उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या पदग्रहण सोहळ्यास जिल्हयातील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्था पदाधिकारी, इनरव्हिल सदस्या उपस्थित राहणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले.









