ठळक घडामोडी

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा कहर; ठिकठिकाणी झाडे पडून, पडझड होऊन मोठे नुकसान!

कुडाळमध्ये तुटलेल्या वीज वाहिनीच्या स्पर्शाने दोन म्हशींचा मृत्यू; सभापतींसह यंत्रणांची धाव

दोडामार्ग ते देवगड पर्यंत वादळी पावसाचा तडाखा; वीजपुरवठा विस्कळीत

सिंधुदुर्ग : जिल्हाभरात अतिवृष्टीने झाडे पडून, पडझड होऊन नुकसान झाले.

कणकवली/कुडाळ/देवगड/सावंतवाडी/दोडामार्ग : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाडे पडून, घरांचे पत्रे उडून, घरे व गोठ्यांवर झाडे पडून तसेच पडझडीच्या घटना घडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुडाळ तालुक्यात मांडकुली येथे तुटलेल्या वीजवाहिनीचा करंट (शाॅक) लागून दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तर देवगड तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आला. बहुतांशी ठिकाणी वीज पोल व वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.
       कुडाळ तालुक्यातील मांडकुली-पेडणेकरवाडी येथे आज सकाळी सात वाजताच्या सुमारास शेतकरी पुरुषोत्तम अणसूरकर यांच्या दोन म्हशी तुटलेल्या वीजवाहिनीच्या स्पर्शाने जागीच दगावल्या, तर दोन गुरे गंभीर जखमी झाली. यावेळी त्यांचा मुलगा प्रथमेश अणसुरकर थोडक्यात बचावला. घटनेची माहीती मिळताच कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांच्यासह मांडकुली सरपंच गौतमी कासकर, उपसरपंच तुषार सामंत, पोलीस पाटील अमित मराठे, माजी सरपंच सचिन साळसकर यांच्यासह महावितरण, पोलीस व पशुसंवर्धन विभागाच्या यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वालावल बाजारपेठेतील एसटी शेडजवळ झाड कोसळले, मात्र जीवितहानी झाली नाही. आकेरी-दांड्याचे गाळू येथे सखाराम मेस्त्री यांच्या पडवीवर वडाचे झाड कोसळून वाहनांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे कुडाळ शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात नीलफणसाचे झाड कोसळून पाण्याच्या टाकीचे नुकसान झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आत्माराम कुडाळकर यांच्या घरावर झाड पडून छपराचे नुकसान झाले, तर सुशीला कुडाळकर यांच्या घराचे पत्रे उडून गेले. चेंदवण येथे गिरीजाबाई मेस्त्री व प्रमोद मेस्त्री यांच्या घरावर औदुंबर व माड कोसळून मोठे नुकसान झाले. तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांवरही झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.
मालवण तालुक्यात म्हावळुंगे येथील रवींद्र डांगे यांच्या घरावर आंब्याची फांदी कोसळून सिमेंट पत्र्यांचे नुकसान झाले, तर गोळवण येथील प्रकाश दाभोळकर यांच्या घरावर माड कोसळून नुकसान झाले. या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही.
      कणकवली तालुक्यात बेळणे खुर्द, कसवण, कलमठ, जांभळगाव, साटमवाडी, फोंडाघाट आदी भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कलमठ येथे शिल्पा हरमलकर यांच्या घराचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. वैशाली मुणगेकर यांचा गोठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. रमेश मुणगेकर यांच्या घराच्या स्वयंपाकघराचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुनीता पवार, सूर्यकांत चाळके, प्रकाश घाडीगावकर, संतोष पडळकर तसेच राजेंद्र भोगटे व प्रमोद तोरसकर यांच्या घरांवर झाडे पडून किंवा पत्रे उडून नुकसान झाले. डामरे येथील दिनकर कानडे यांच्या भातशेतीचाही पुरामुळे फटका बसला.
       दोडामार्ग तालुक्यात विरडी येथील नारायण गवस यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच वझरे-जाधववाडी येथे अवघ्या अर्ध्या तासाच्या वादळी पावसात तब्बल २८ पक्क्या घरांचे अंशतः नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनामे सुरू आहेत.
        देवगड तालुक्यात सांडवे-डोबकरवाडी येथे रामजी परब यांच्या घरावर व मांगरावर माड कोसळून नुकसान झाले. तसेच तांबळडेग येथील एक व्यक्ती मासेमारीसाठी गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. त्यांचा मृतदेह सकाळी समुद्रकिनारी आढळून आला असून शवविच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
       सावंतवाडी तालुक्यात ४ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मासुरे येथे तीन घरे पूर्णतः तर २७ घरे अंशतः कोसळली आहेत. सांगेली येथेही एक घर पूर्णपणे पडले असून महसूल विभागाकडून पंचनामे सुरू आहेत.
       सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पडझड, शेतीचे नुकसान, रस्त्यांवर झाडे कोसळणे आणि घरांचे नुकसान झाल्याने नागरिकांना मोठा फटका बसला आहे. महसूल प्रशासनाकडून सर्व नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!