ठळक घडामोडी

कुडाळ न.पं.प्रशासनाच्या मनमानीविरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकाच उतरली मैदानात!

वैभव नाईकांसह ठाकरे शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस (SP), काँग्रेस आणि ‘मनसे’चा थेट पाठिंबा

नगरसेविका संध्या तेरसेंचे न.पं. कार्यालयासमोर उपोषण

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ नगरपंचायतीतील कथित जागा गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदू काॅलनी प्रभागातील भाजपाच्या सत्ताधारी नगरसेविका सौ.संध्या प्रसाद तेरसे यांनी आज शुक्रवारी सकाळ वाजल्यापासून कुडाळ नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूच केली आहे. या उपोषणाला भाजप पदाधिकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठींबा दिला.
       कुडाळ शहरातील न.पं.ची १४१ गुंठे जमीन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मुळ मालक व कुळ यांच्या ताब्यात गेल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी करीत याप्रकरणी दोषींवर कारवाई होण्यासाठी उपोषण केल्याचे सांगितले. या उपोषणाला भाजप जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांच्यासह ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी उपोषणस्थळी येऊन प्रशासनाची बाजू मांडली. तर संध्या तेरसेंसह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या चुकीच्या कामकाजावर बोट ठेवले. या चर्चेदरम्यान नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, राजू राऊळ, राजन नाईक, मंदार श्रीकृष्ण शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट, ओंकार तेली, सुनील भोगटे, संतोष शिरसाट, कृष्णा धुरी, किरण शिंदे, निलेश परब, सुशील चिंदरकर, शिवाजी घोगळे, कुणाल किनळेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित आहेत.

error: Content is protected !!