
विद्यार्थ्यांनी शिक्षणातून शाळा, तालुका व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे – सभापती मिलिंद नाईक
सभापती मिलिंद नाईक यांच्या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या माध्यमातून तुळसुली बुडक्याचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने सभापती मिलिंद नाईक यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सभापती मिलिंद नाईक म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून स्वतःसह आपल्या शाळेचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. शिक्षण हीच यशाची खरी गुरुकिल्ली असून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा योग्य उपयोग करून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे.”
मोफत वह्यांचे वाटप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाबद्दल पालकांनी सभापती मिलिंद नाईक यांचे आभार व्यक्त केले. यावेळी प्रसाद नाईक, बाबू कासवेकर, सुधीरराव, बाळा नाटेकर, धाकू वरक, मुख्याध्यापक गावडे, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.









