
३० जूनपासून बीएलओ घरोघरी भेटी; मतदार पडताळणी मोहीम सुरू
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे तहसीलदार सचिन पाटील यांचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोग तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुडाळ तालुक्यात ‘विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मतदार यादीतील स्थलांतरित, मृत अथवा दुबार नावे वगळून पूर्णतः शुद्ध, पारदर्शक व छायाचित्रयुक्त अद्ययावत मतदार यादी तयार करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना २४ व २५ जून रोजी कुडाळ येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदार पडताळणी प्रक्रियेला गती देण्यात येणार असल्याची आल्याची माहीती कुडाळचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
या गृहभेटींदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्यासोबत अधिकृत प्रगणक फॉर्म (Enumeration Form) घेऊन येणार आहेत, ज्यामध्ये पूर्वीच्या विशेष सखोल पुनरीक्षणातील (२००२) डेटाच्या आधारे मतदारांची माहिती आधीपासूनच पूर्व-मुद्रित (Pre-filled) असेल. मतदारांनी केवळ या माहितीची अचूकता तपासून, आवश्यक तिथे दुरुस्त्या सूचवून त्यावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या प्रगणक फॉर्ममधील नोंदींच्या आधारेच दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी (Draft Electoral Roll) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. ५ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज क्रमांक ६, अपात्र नावांच्या विलोपनासाठी नमुना अर्ज क्रमांक ७, आणि तपशिलातील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी नमुना अर्ज क्रमांक ८ सर्व मतदान केंद्रांवर, तहसील कार्यालयात आणि ‘व्होटर हेल्पलाईन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दाखल झालेल्या सर्व दाव्यांचा कायदेशीर निपटारा दि. ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करून, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम अद्ययावत छायाचित्रित मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कुडाळ तालुक्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्या अधिकृत ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) यांची त्वरित नियुक्ती करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या वैधानिक निर्देशानुसार राबविल्या जाणाऱ्या या शुद्धीकरण प्रक्रियेत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव पडताळणीशिवाय वगळले जाणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील सर्व सुज्ञ मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना योग्य व अचूक माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.









