ठळक घडामोडी

कुडाळ पंचायत समिती सभेत वीज, एसटी, रस्ते अन् शिक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा!

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून योगेश धुरींची नाराजी; सभापती मिलिंद नाईकांचे अन्याय होणार नसल्याचे आश्वासन

दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांबाबत आ. निलेश राणे, मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत एसटी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम शिक्षण विभाग अंतर्गत तसेच अन्य विविध विषयांवर सदस्यांनी चर्चा घडवून आणली.
      हि सभा आज (शुक्रवारी) सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सिताराम तेली, गटविकास अधिकारी मनोज भोगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.हिर्लेकर यांच्यासह सर्व सदस्य, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
      पं.स.सदस्य योगेश धुरी यांनी पंधरावा वित्त आयोगांतर्गत सर्व सदस्यांना समान निधीचे वाटप झालेले नाही. आपण सुचविलेली साडेआठ लाखांची कामे बदलून, दुसरीच कामे समाविष्ट करण्यात आली असून हा आमच्यावर अन्याय आहे, असे सांगून नाराजी व्यक्त केली. त्यावर सभापतींनी यांनी, सर्व पं.स.गणात निधी जायला हवा, आणि तशा पद्धतीने सर्व ठिकाणची कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपली असल्याचे सांगून एकट्या माणगाव पं.स.गणात एकूण २५ लाखांची विकासकामे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र श्री.धुरींनी आपले मत नोंदवून घेण्याची सूचना केली. तसेच गोठोस, मोरेसह तालुक्यात काही ठिकाणी मंजूर कामांआधीच रस्त्याची कामे करण्यात आल्याचे योगेश धुरी यांनी सभागृहात सांगत याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी केली. त्यावर सभापतींनी अशा कामांची माहीती मागवून घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
     पिंगुळीला जोडलेली वेंगुर्लेची वीज लाईन बदलून एमआयडीसीची वीज लाईन जोडण्याची मागणी ममता राऊळ यांनी केली. तर माणगाव ते शिवापूर दरम्यान ट्री कटींग न केल्याने या भागात वीज समस्येला नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी श्री. धुरी यांनी केली. सभापतींनी तालुक्यातील वीज समस्या तातडीने सोडवून, पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना महावितरणला केली. श्री. म्हाडेश्वर यांनी आंब्रड पंचक्रोशीत ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, ग्राहकांच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. याबाबत आपण महावितरणच्या अधिका-यांशी संपर्क साधून विचारणा केली असता सदर प्रॉपर्टी आमची असल्याचे बेजबाबदारपणाचे उत्तर अधिका-यांकडून देण्यात आल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. यापुढे ग्राहकांच्या संमतीशिवाय एकही स्मार्ट वीज मीटर बसवला जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी अनवधानाने चूक झाल्याचे मान्य केले. यावर सभापतींनी कोणाचीही प्राॅपर्टी आपली असल्याची चुकीची वक्तव्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करू नयेत, असे सांगून आवश्यक त्या सूचना दिल्या.
        कुडाळ-श्रीरामवाडी सकाळची शालेय बसफेरी वेळेत सोडून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी सदस्या सौ. जळवी यांनी केली. तर बंद असलेली माऊली मंदीर बसफेरी सुरू करण्याची मागणी अर्चना बंगे यांनी केली. मंगेश प्रभू यांनी सा.बां.विभागाची होणारी कामे प्रत्यक्षात कामे झाली पाहीजेत, अशी भूमिका मांडली. श्री. धुरी यांनी माणगाव मधील खड्डे, गटार समस्यांबाबत लक्ष वेधले असता, तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले.
      संतोष कांदळकर यांनी, पडवे व कसाल बालमवाडी शाळेतील शिक्षक प्रश्नी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर शिक्षकांची प्रशिक्षणे सुरू असून, चार दिवसात शिक्षक हजर होतील असे गटशिक्षणाधिका-यांनी सांगितले. अर्चना घावनळकर यांनी घावनळेतील एका शाळेच्या एका खोलीचे अपूर्ण असलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी उमेद अंतर्गत घावनळे ग्राम प्रभाग संघाला कुडाळ मधील गावठी आठवडा बाजाराची जागा रविवार वगळता, इतर दिवशी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
       श्री. प्रभू यांनी गोवेरी ग्रा.पं.च्या ग्रामसेवकांना पावशीचा कार्यभार न देता, त्यांना गोवेरीतच ठेवण्यात यावे अशी मागणी केली. तर श्री.धुरी यांनी पं.स.च्या शौचालयातील अस्वच्छेबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांसंदर्भात आ.निलेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठविल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची टीमही दाखल झाली असून, दशावतारी कलाकारांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे व मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा ठराव सभापती श्री. नाईक यांनी यावेळी मांडला.

error: Content is protected !!