ठळक घडामोडी

जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या माध्यमातून साळगाव शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप!

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश; विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करावा – गंगाराम सडवेलकर

साळगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षवाटप; पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा

कुडाळ : प्रतिनिधी
      ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या माध्यमातून साळगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
       यावेळी मार्गदर्शन करताना गंगाराम सडवेलकर म्हणाले, प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना केली तर भविष्यात अनेकांना स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आजच्या पिढीने स्वीकारणे आवश्यक आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक असून शिक्षणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे संस्कारही त्यांनी जोपासावेत. जिल्हा परिषद शाळा हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भक्कम पाया असून मजबूत पाया असेल तर भविष्यातील वाटचाल निश्चितच यशस्वी होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात कीर्तिवंत होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
      या कार्यक्रमास उपविभागप्रमुख सचिन ठाकूर, दत्ता लाड, शाखाप्रमुख नामदेव तावडे, युवासेनेचे सूरज घाटकर, मांडकुलीचे उपसरपंच तुषार सामंत, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पिळणकर, शिक्षिका सौ. बांदिवडेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!