
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा सकारात्मक निर्णय
‘कलाकारांच्या पाठीशी आ. निलेश राणे खंबीरपणे उभे राहिले’; पुरुषोत्तम कोचरेकर यांची कृतज्ञता
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक कलाकारांच्या हक्कासाठी आणि शासकीय पाठबळासाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी पारंपरिक कलाकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केला. त्यामुळे “आमच्या जीवनात सोन्याचा दिवस उजाडला,” अशी भावना सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर यांनी व्यक्त केली.
कुडाळ येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सल्लागार संतोष रेडकर, चारू मांजरेकर, पप्पू नांदोसकर, विलास तेंडोलकर, सुरेश गुरव, प्रसाद शिरोडकर, यश जळवी, गुरु मेस्त्री, पुरुषोत्तम खेडेकर, दत्तप्रसाद शेणई यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.
कोचरेकर म्हणाले, कलाकारांना ओळखपत्र मिळावे तसेच शासनाच्या विविध मानधन योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने १६ जून २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक बहुउद्देशीय संघाची स्थापना करण्यात आली. संघटनेने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. कलाकारांच्या अडचणी ओळखून आमदार निलेश राणे यांनी मुंबईतील पु. ल. देशपांडे सभागृहात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत कलाकारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. त्यानंतर पावसाळी अधिवेशनातही त्यांनी हा विषय आक्रमकपणे मांडला आणि त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे यांचे कोचरेकर यांनी जाहीर आभार मानले. तसेच या संपूर्ण संघर्षात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल आणि देवेंद्र सामंत यांनी संघटना स्थापनेपासून कलाकारांना सातत्याने मोलाची साथ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सल्लागार संतोष रेडकर यांनी दशावतारी कलाकारांच्या आर्थिक अडचणींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, दशावतारी कलाकार केवळ अभिनय करत नाही, तर बुटापासून मुकुटापर्यंत लागणारे पोशाख, मेकअप साहित्य, रंग, वैयक्तिक बॅग आणि अन्य सर्व साहित्य स्वतःच्या खर्चातून खरेदी करतो. नाटक मालकाकडून केवळ पेटारा उपलब्ध करून दिला जातो. त्यामध्ये तलवारी, गदा, गणपतीचे मुखवटे यांसारखे मर्यादित साहित्य असते. पात्र साकारण्यासाठी लागणाऱ्या इतर सर्व वस्तू कलाकार स्वतःच्या मालकीच्या वापरत असल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडतो. म्हणूनच शासनाने कलाकारांना मिळणारे मानधन कोणत्याही परिस्थितीत कमी करू नये, अशी ठाम मागणी रेडकर यांनी केली. पारंपरिक दशावतार ही कोकणच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख असून या कलेचे जतन करण्यासाठी कलाकारांना अधिकाधिक शासकीय संरक्षण आणि आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









