
मद्यधुंद स्थितीत बेदरकारपणे ट्रेलर चालविणा-या दोन चालकांना पोलिसांचा दणका
ओसरगाव टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई; ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मद्यपान करून बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने मल्टी एक्सेल ट्रक (ट्रेलर) चालविणा-या दोन ट्रक चालकांवर महामार्ग पोलीसांनी धडक कारवाई केली. दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आल्याची माहीती महामार्ग पोलीसांकडून देण्यात आली. ही घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन अवजड ट्रेलर भरधाव वेगाने आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने गोवाहून मुंबईच्या दिशेने जात होते. दोन्ही ट्रेलर चालक सर्व वाहनांना हुलकावणी देत बेदरकारपणे ओव्हरटेक करत असल्याने महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, एका सतर्क नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे आणि महामार्ग पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळला.
पावशीतील वाटवे क्रेनचे मालक मेहनील वाटवे हे त्याच मार्गावरून प्रवास करत असताना त्यांनी दोन ट्रेलर भरधाव वेगाने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करत धावत असल्याचे पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कोणताही वेळ न दवडता कसाल महामार्ग पोलीस कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच महामार्ग पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. ओसरगाव टोल नाका येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत हडकर, पोलीस नाईक अमोल महाडिक, कैलास ढोले तसेच पोलीस शिपाई सुरज ठाकूर, महादेव साबळे आणि कुंडलिक वानोळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने दोन्ही ट्रेलर थांबवून त्यांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान दोन्ही ट्रेलर चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे आढळून आले. यानंतर महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी दीपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही चालकांविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही ट्रेलर गोवा येथून सांगलीला जात होते.
वेळीच मिळालेल्या माहितीवर पोलिसांनी तत्परतेने प्रतिसाद दिल्याने महामार्गावर होऊ शकणारा गंभीर अपघात टळल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. मेहनील वाटवे यांच्या सतर्कतेचे तसेच महामार्ग पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी महामार्ग पोलिसांनी सर्व वाहनचालकांना मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.









