ठळक घडामोडी

मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे कामबंद आंदोलन!

सफाई कर्मचाऱ्याला धमकावल्याने संतप्त कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

अखेर कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

मालवण : महेश कदम
      मालवण शहरातील रेवतळे येथे आज कचरा उचलण्याच्या कारणावरून स्थानिक नगरसेविकेच्या पतीने नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी दिल्याने या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामबंद आंदोलन पुकारले. याबाबत कामगारांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर नगरसेवकांचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरत कामगारांना अशा प्रकारे धमकी देणे चुकीचे असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक सुदेश आचरेकर यांनीही मध्यस्थी केली. यावेळी संबंधित नगरसेविकेने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
     मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कंत्राटी सफाई कामगार नेहमीप्रमाणे सकाळी रेवतळे परिसरात कचरा उचलण्याचे काम करत होते. यावेळी तेथे आलेल्या स्थानिक नगरसेविका अनिता गिरकर यांच्या पतीने कंत्राटी सफाई कामगाराला थेट मारहाणीची धमकी दिली. या अरेरावीमुळे संतप्त झालेल्या सर्व कंत्राटी सफाई कामगारांनी एकत्र येत कामबंद आंदोलन छेडले आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर कामगारांनी नगरसेवकांचे लक्ष वेधले. यावेळी नगरसेवक सुदेश आचरेकर व महेंद्र म्हाडगुत यांनी कामगारांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनीही सफाई कामगारांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेत कामगारांच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केली. नगरसेवकांच्या कोणत्याही नातेवाईकाला अशा प्रकारे कामगारांना धमकी देण्याचा अधिकार नाही. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मी पूर्णपणे सफाई कामगारांच्या पाठीशी उभी आहे, असे सौ. चव्हाण यांनी सांगितले.
या सर्व प्रकारावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. घडलेला प्रकार पूर्णपणे चुकीचा असून यापुढे अशा घटना घडणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर, नगरसेविका अनिता गिरकर यांनी स्वतः समोर येत घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याने वादावर पडदा पडला.

error: Content is protected !!