
बीएलओ घरोघरी भेट देणार, दावे-हरकती ऑनलाईन; जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण माहीती
जिल्हा प्रशासनाने जाहीर केले पुनरीक्षणाचे वेळापत्रक; मतदार पडताळणीसाठी डिजिटल सुविधांचा लाभ
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले असून, मुंबई आणि इतर शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मतदार यादीतील नावांची पडताळणी किंवा दुरुस्ती करण्यासाठी चाकरमान्यांना ऐन पावसाळ्यात गावी येण्याची कोणतीही आवश्यकता नाही, अशी सकारात्मक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रशासनाने यासाठी अत्यंत सुटसुटीत आणि नागरिकस्नेही नियोजन केले आहे, ज्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
१. बीएलओ (BLO) स्वतः देणार घरोघरी भेट (३० जून ते २९ जुलै २०२६)
मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः गावोगावी प्रत्येकाच्या घरी भेट देणार आहेत. या काळात चाकरमानी प्रत्यक्ष हजर नसले, तरी त्यांच्या कुटुंबातील इतर उपलब्ध सदस्य किंवा नातेवाईक बीएलओ अधिकाऱ्यांना माहिती देऊ शकतात तसेच गणना प्रपत्रावर मतदाराच्या वतीने स्वाक्षरी करून देऊ शकतात.त्यामुळे चाकरमान्यांना केवळ या कामासाठी गावी जाण्याची घाई करण्याची किंवा सुट्टी घेण्याची गरज उरणार नाही.
२. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि ऑनलाईन सुविधेचा वापर
प्रशासनाने डिजिटल प्रणालीवर विशेष भर दिला आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, चाकरमानी मुंबईत किंवा ते जिथे आहेत तिथूनच निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (voters.eci.gov.in) किंवा ‘व्होटर हेल्पलाईन’ (Voter Helpline app) किंवा ECINET मोबाईल ॲपवर आपले नाव घरबसल्या अत्यंत सोप्या पद्धतीने तपासू शकतात.
३. ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्याची संधी (५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६)
जर मतदार यादीत काही दुरुस्ती करायची असेल किंवा नाव जोडायचे/वगळायचे असेल, तर त्यासाठी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ‘दावे व हरकती’ दाखल करता येतील. डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे चाकरमानी कोणत्याही त्रासाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
४. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (BLA) करणार सहकार्य
गावातील मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे अधिकृत मतदान केंद्र प्रतिनिधी (BLA) देखील उपस्थित राहणार आहेत. हे प्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने चाकरमान्यांच्या नावांची पडताळणी सहज पूर्ण होऊ शकते.
प्रशासनाचे आवाहन:
“निवडणूक आयोगाची ही मोहीम पूर्णपणे लोकस्नेही आणि डिजिटल स्वरूपाची आहे. चाकरमान्यांनी आपल्या कामाचा खोळंबा करून किंवा प्रवासाचा त्रास सहन करून गावी येण्याची गरज नाही. कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातून आणि डिजिटल साधनांचा वापर करून या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पुनरीक्षण कार्यक्रम तपशील (२०२६)
पुनरिक्षण कार्यक्रम तपशिल पुढीलप्रमाणे
दि 30.06.2026 ते दि 29.07.2026 बीएलओ घरोघरी भेटी देतील
दि 05.08.2026 प्रारुप मतदार यादी प्रसिदी
दि 05.08.2026 ते 04.09.2026 दावे हरकती दाखल करणे
दि 05.08.2026 ते 03.10.2026 प्राप्त दावे व हरकतीवर निर्णय घेणे
दि 07.10.2026 अंतीम मतदार यादी प्रसिध्द करणे.









