ठळक घडामोडी

गुन्ह्यांना घाबरणार नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार!

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
    राज्यातील स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कुडाळ गांधी चौकात झालेल्या आंदोलनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेना (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि अन्यायाविरोधातील लढा यापुढेही सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
     शिरसाट म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत अन्याय, भ्रष्टाचार आणि तरुणांच्या हक्कासाठी आवाज उठवणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे या प्रश्नावर आंदोलन करणे ही काळाची गरज होती आणि भविष्यातही विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरू राहील. आंदोलनानंतर मनाई आदेशाचे तांत्रिक कारण पुढे करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर टीका केली. पेपरफुटी प्रकरणातील मूळ दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या युवा सैनिकांवर गुन्हे दाखल करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. अशा कारवायांमुळे आमचा आवाज दाबला जाणार नाही आणि कोणत्याही दडपशाहीला आम्ही घाबरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
      प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने न्यायालयात लढा देणार असल्याचे सांगत शिरसाट म्हणाले, “आम्ही कायद्याचा आदर करणारे नागरिक आहोत. मात्र विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका कायम राहील. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून महाराष्ट्रातील तरुण पिढीच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. या संघर्षात युवा सैनिकांसह सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा असल्याचा विश्वास आहे.”

error: Content is protected !!