
कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते शुभारंभ
कुडाळ : प्रतिनिधी
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव अंतर्गत उपकेंद्र साळगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते लाभार्थी कु. वेदांत रामचंद्र पवार या बालकास पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
यावेळी सभापती श्री. नाईक यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे आवाहन केले. पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास आरोग्य कर्मचारी फॅन्सी डिसूजा, श्रीमती झारापकर, आशा स्वयंसेविका कारेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन पवार, आरोग्य सेवक मिमुद्दीन शेख तसेच मोहिमेच्या पर्यवेक्षणासाठी तालुकास्तरीय पर्यवेक्षक महादेव तेली उपस्थित होते. सर्व उपस्थितांच्या सहकार्याने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ यशस्वीरीत्या पार पडला. आरोग्य विभागामार्फत सर्व पालकांना आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









