ठळक घडामोडी

शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात; जनतेवर अन्याय होऊ देणार नाही!

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची माहीती

नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा मंजूर होणार नाही – अभिषेक गावडे

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नागरिकांना हरकती नोंदविण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आवश्यक ते सहकार्य केले जात असून, विकास आराखड्यामुळे कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही किंवा कुडाळ शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्या शिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी दिली आहे.
     श्री.गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कुडाळ शहराचा विकास आराखडा हा नव्याने तयार करण्यात आलेला नसून, यापूर्वीच तो तयार करण्यात आला होता. मात्र, तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. आता पुढील वीस वर्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, नागरिकांना आपली मते, सूचना आणि हरकती नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्या शिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही.
विकास आराखडा जनतेपासून लपवून किंवा नागरिकांना अंधारात ठेवून मंजूर करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे उगाच कोणाला आंदोलन करायची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
    आराखड्यातील विविध आरक्षणे, रस्ते, सार्वजनिक सुविधा किंवा इतर कोणत्याही बाबींविषयी नागरिकांना आक्षेप अथवा सूचना असल्यास त्या ८ जुलैपर्यंत नगरपंचायत कार्यालयात नोंदविता येणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचेही गावडे यांनी सांगितले.
     यावेळी त्यांनी सांगितले की, कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही या विषयात विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या असून, विकास आराखड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.तसेच कुडाळ शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्या शिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही.त्यामुळे कोणाला आंदोलन करायची गरज पडणार नाही असे अभिषेक गावडे यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!