
ओळखपत्र, थेट अनुदान आणि राज्य पुरस्कारांत समावेश; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा
कोकणच्या दशावतारी कलेच्या सांस्कृतिक उत्कर्षाची नांदी; शासनाच्या निर्णयाचे देवेंद्र नाईक यांच्याकडून स्वागत
मुंबई / सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी कोकणातील दशावतारी कलाकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत सभागृहाचे लक्ष वेधल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दशावतारी कलाकारांसाठी ४ कोटी ४० लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीची घोषणा केली आहे. तसेच कलाकारांना ओळखपत्र, थेट आर्थिक सहाय्य, जिल्हास्तरावर नोंदणी मोहीम आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये समावेश करण्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. हा निर्णय कोकणातील दशावतारी कलाकारांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक उत्कर्षाची नांदी ठरेल, अशी माहिती चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ(चेंदवण)चे मालक देवेंद्र मोरेश्वर नाईक यांनी दिली.
देवेंद्र नाईक यांनी सांगितले की, २६ मे २०२५ रोजी आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने दशावतारी कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत दशावतारी कलाकारांना ओळखपत्र देणे, नियमित आर्थिक अनुदान, स्वतंत्र शासन निर्णय (जीआर), कलाकारांची नोंदणी, तसेच अन्य विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र, वर्षभर उलटूनही या मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही झाली नव्हती. उलट सांस्कृतिक विभागाकडून ओळखपत्र देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच बैठकीत आश्वासन देण्यात आलेल्या समितीची स्थापना आणि शासन निर्णयही प्रलंबित राहिले होते. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात हा विषय पुन्हा जोरकसपणे मांडला. ग्रामीण भागातील कलाकारांना ऑनलाइन गुगल फॉर्म भरणे कठीण जात असल्याने जिल्हास्तरावर अधिकारी स्वतः जाऊन शिबिरे आयोजित करून नोंदणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच लावणीसारख्या इतर लोककलांना शासनाकडून विविध पुरस्कार मिळत असताना हिंदू संस्कृतीचे जतन करणाऱ्या दशावतारी कलाकारांना योग्य सन्मान मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावर उत्तर देताना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कोकणची ओळख जगासमोर नेण्याचे मोठे कार्य दशावतारी कलाकार करीत असल्याचे सांगत कलाकारांसाठी ४ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या निधीपैकी ५० टक्के रक्कम थेट कलाकार, वादक आणि नेपथ्यकारांच्या बँक खात्यात, तर उर्वरित ५० टक्के रक्कम दशावतारी नाट्य मंडळांच्या मालकांना दिली जाईल. यासंदर्भातील शासन निर्णय पुढील १५ दिवसांत काढण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
याशिवाय ऑनलाइन नोंदणीची किचकट प्रक्रिया बंद करून विभागीय अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे घेऊन कलाकारांची प्रत्यक्ष नोंदणी करतील आणि त्यांना अधिकृत ओळखपत्र दिले जाईल, अशी घोषणाही शेलार यांनी केली. राज्य सांस्कृतिक पुरस्कार (रु. ३ लाख) आणि युवा सांस्कृतिक पुरस्कार (रु. १ लाख) यामध्येही दशावतारी कलाकारांचा समावेश करण्याबाबत संबंधित समितीला सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. दशावतारी कलाकारांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने स्थापन होणाऱ्या समितीसाठी देवेंद्र नाईक, दत्तप्रसाद शेणई, संतोष रेडकर, राजाराम धुरी आणि शरद मोचेमाडकर यांच्या नावांची शिफारस आमदार निलेश राणे यांनी केल्याची माहितीही देवेंद्र नाईक यांनी दिली.
दशावतारी कलाकारांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्याबद्दलही कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील लोककलेच्या जतनासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचेही कलाकारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या निर्णयामुळे दशावतारी कलाकारांना प्रथमच थेट आर्थिक सहाय्य, अधिकृत ओळख आणि शासनाकडून संस्थात्मक आधार मिळणार असून, कोकणातील या पारंपरिक लोककलेच्या संवर्धनासाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरेल, असा विश्वास देवेंद्र नाईक यांनी व्यक्त केला.









