
गोव्याहून मुंबईच्या दिशेने होत असलेल्या अवैध मद्य वाहतुकीचा पर्दाफाश
चौवीस तासातील एलसीबीची दुसरी मोठी कारवाई
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोव्याहून मुंबईच्या दिशेने अवैधरित्या नेण्यात येणा-या गोवा बनावटी दारूसह सुमारे १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीची दारू, दहा टायरचा टाटा सिग्मा ट्रक आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला असून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४) १.४५ वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जिजामाता चौक, ओरोस येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत १ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू, ३५ लाख रुपयांचा टाटा सिग्मा दहा टायर ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३३६(२)(३), ३४०(२), ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोजा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर आणि ऋषिकेश टोपले यांनी केली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेला गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत २१ लाख ६३ हजार ४५० रूपये किंमतीच्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थासह टेम्पो मिळून एकूण ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई 3 जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओरोस येथील खर्येवाडी परिसरातील खालसा पंजाबी ढाब्यासमोर गोवा–मुंबई महामार्गावर करण्यात आली होती.









