
स्वखर्चातून रस्त्यालगतची झाडी केली साफ; ग्रामस्थांनी मानले सभापती मिलिंद नाईक यांचे आभार
मुळदे, तुळसुली, खुटवळवाडी परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा; वाढलेली झाडी हटवली
कुडाळ : प्रतिनिधी
मुळदे–खुटवळवाडी ते बामणादेवी या महत्त्वाच्या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला होता. तसेच पावसाळ्यात झाडी अधिक वाढल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. या समस्येची गंभीर दखल घेत कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी स्वखर्चातून रस्त्यालगतची वाढलेली झाडी हटविण्याचा उपक्रम हाती घेतला.
त्यांच्या पुढाकारामुळे मुळदे, तुळसुली, खुटवळवाडी, बामणादेवी तसेच परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. झाडी हटविल्याने रस्त्याची दृश्यमानता वाढली असून वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत झाली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून या मार्गावरील झाडी हटविण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत सभापती मिलिंद नाईक यांनी कोणत्याही शासकीय निधीची प्रतीक्षा न करता स्वतःच्या खर्चातून झाडी हटविण्याचे काम पूर्ण करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
या कामाबद्दल मुळदे, तुळसुली, खुटवळवाडी, बामणादेवी परिसरातील ग्रामस्थ, वाहनधारक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त करत सभापती मिलिंद नाईक यांचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे सार्वजनिक समस्यांकडे तत्परतेने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली.









