
पेपरफुटीविरोधात शिवसेना(उबाठा)-युवासेनेने कुडाळात केले होते आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका; कुडाळ पोलिसांची कारवाई
कुडाळ : प्रतिनिधी
देश आणि राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी कुडाळ येथील गांधी चौकात बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व युवासेनेच्या वतीने उपरोधात्मक डमी पेपर विक्री केंद्र आंदोलन केले होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू असलेल्या जिल्हाधिकार्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून, शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे निदर्शने केल्याप्रकरणी ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्यासह आठ जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश कृष्णा भोई यांनी फिर्याद दिली आहे.
राज्य व जिल्ह्यात सध्या विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून आंदोलने होण्याची शक्यता आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकार्यांनी २४ जून २०२६ रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये जिल्ह्यात ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१’ च्या कलम ३७(१)(३) अंतर्गत २५ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ९ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश (जमावबंदी) लागू केला आहे. या आदेशाची माहिती समाजमाध्यमांद्वारेही सर्वदूर प्रसारित करण्यात आली होती. दरम्यान, बुधवार दि. १ जुलै रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कुडाळ येथील गांधी चौकात आंदोलन होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोहेकॉ महेश भोई, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव, पोहेकॉ संजय कदम, योगेश वेंगुर्लेकर, सचिन गवस आणि महिला पोहेकॉ ज्योती रायशिरोडकर यांचे पथक घटनास्थळी तैनात झाले होते.
बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गांधी चौक येथे युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांच्यासह अमरसेन सावंत (रा. डिगस), योगेश धुरी (रा. माणगाव), अमित राणे (रा. कुडाळ), अतुल बंगे (रा. वालावल), संदीप महाडेश्वर (रा. कुडाळ), गुरुनाथ गडकर (रा. कुडाळ), गंगाराम सडवेलकर (रा. पिंगुळी) आणि इतर १० ते १२ कार्यकर्ते एकत्र जमले. त्यांच्या हातात भ्रष्ट सरकारी स्पर्धा परीक्षा पेपर विक्री केंद्र पेपरफुटी बहाद्दर सरकारचा जाहीर निषेध असा मजकूर असलेले बॅनर होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. कलम १३५ अन्वये गुन्हा जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना आणि कोणतीही पूर्वपरवानगी नसताना बेकायदेशीरपणे गर्दी जमवून आंदोलन केल्याने, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) चे उल्लंघन झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन गवस करत आहेत.









