ठळक घडामोडी

कुपोषण मुक्तीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा ‘मास्टरप्लॅन’..!

तीव्र कुपोषित बालके लोकप्रतिनिधी-अधिकारी घेणार दत्तक; १ जुलैपासून प्रत्यक्ष मोहीम सुरू होणार

जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांची माहीती; ६५ वर्षांवरील एकाकी वृद्धांचीही जि.प. घेणार जबाबदारी

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
        जिल्ह्यातील कुपोषण पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आता थेट ‘बालक दत्तक योजना’ राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ‘सॅम’ (तीव्र कुपोषित) श्रेणीतील २२ बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ बनवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जिल्ह्यातील ६५ वर्षांवरील एकाकी वृद्ध नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारीही जिल्हा परिषद उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
    सिंधुदुर्गनगरी येथे सोमवारी (२९ जून) आयोजित पत्रकार परिषदेत श्री.कामत बोलत होते. यावेळी जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, समाजकल्याण सभापती रुहीता तांबे, संदीप गावडे, सावी लोके, रविंद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी आदि उपस्थित होते.
           यावेळी जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले की, खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा स्तर उंचावण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील २२ ‘सॅम’ बाधित बालके विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने दत्तक घेतली जातील. यामध्ये स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी ५ बालके दत्तक घेणार आहे. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, आमदार नितेश राणे यांचे सुपुत्र अभिराज राणे (जे २ बालके दत्तक घेतील), तसेच जिल्हा परिषदेचे इतर पदाधिकारी आणि संबंधित खात्याचे अधिकारी प्रत्येकजण बालके दत्तक घेतील. ही सर्व प्रक्रिया १ जुलैपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे. तसेच ‘मॅम’ (मध्यम कुपोषित) श्रेणीतील ३७६ बालके पुन्हा ‘सॅम’ श्रेणीत जाऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
    ज्येष्ठ व एकाकी नागरिकांच्या घरी जि.प. सदस्य देणार भेटी!
    पालकमंत्र्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार, जिल्ह्यातील ६५ वर्षांवरील वृद्ध जोडपे किंवा घरात एकटेच राहणारे स्त्री/पुरुष यांच्या आरोग्याची आणि दैनंदिन गरजांची काळजी जिल्हा परिषद घेणार आहे. जिल्हा परिषदेचे सर्व ५० सदस्य अशा नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस करतील. त्यांना औषधोपचार, रेशन, आणि आजारपणात डॉक्टरकडे नेण्याची सुविधा उपलब्ध आहे की नाही, यावर प्रत्यक्ष लक्ष ठेवले जाईल. यासाठी आरोग्य पथके, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचे जाळे सक्रिय करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
     पल्स पोलिओ मोहिमेत सिंधुदुर्ग अव्वल, उद्दिष्ट पार!
       राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने यंदाही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यात २६,८०६ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात २७,९६८ बालकांना डोस देऊन १०० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यात ९०४ लसीकरण केंद्रे, ८० फिरती पथके आणि ४३ प्रवासी तपासणी पथके तैनात करण्यात आली होती. पुढील टप्प्यात ग्रामीण भागात ३ दिवस तर शहरी भागात ५ दिवस ‘गृहभेट’  मोहीम राबवून शून्य ते पाच वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी येणाऱ्या ‘फ्लोटिंग’ प्रवाशांच्या मुलांवरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे ते म्हणाले.

error: Content is protected !!