ठळक घडामोडी

‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ मोहिमेची राज्यभर सुरुवात; एमएस-सीआयटीमध्ये AIचा समावेश!

एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा SKOCH Award; जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांची माहिती

AI-सक्षम एमएस-सीआयटी, KLiC कोर्सेस आणि मोफत AI मास्टरक्लास उपलब्ध

कुडाळ : प्रतिनिधी
      महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अद्ययावत एमएस-सीआयटी अभ्यासक्रम, २६५ हून अधिक KLiC व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच सर्वांसाठी मोफत AI मास्टरक्लास उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचबरोबर एमएस-सीआयटीला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित SKOCH Award प्राप्त झाल्याची माहिती एमकेसीएलचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
       प्रणय तेली म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत एमकेसीएलने एमएस-सीआयटीच्या माध्यमातून १.७ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर केले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्र AI-सक्षम करण्यासाठी ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ ही मोहीम २३ जूनपासून सुरू झाली असून ती पुढील ६० दिवस राज्यभर राबविण्यात येणार आहे. एमएस-सीआयटीला डिजिटल साक्षरता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित SKOCH Award मिळाला असून, हा पुरस्कार डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरणातील एमकेसीएलच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेअंतर्गत www.mscit.ai⁠ या संकेतस्थळावर सर्वांसाठी ६० मिनिटांचा मोफत AI मास्टरक्लास उपलब्ध आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिक यांना या मास्टरक्लासचा लाभ घेता येणार असून, तो पूर्ण केल्यानंतर एमएस-सीआयटी केंद्रामार्फत प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
      नवीन एमएस-सीआयटी अभ्यासक्रमात AI, सायबर सुरक्षा, डेटा साक्षरता आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. ChatGPT, Microsoft Copilot, Google Gemini, Canva AI यांसह १२५ हून अधिक AI टूल्स आणि २५० पेक्षा अधिक आधुनिक डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. तसेच AI-आधारित ‘ERA KRANTI’ चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) अभ्यासक्रमासह KLiC अंतर्गत २६५ हून अधिक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध असून, राज्यातील ५ हजारांहून अधिक अधिकृत एमकेसीएल प्रशिक्षण केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रणय तेली यांनी दिली. तसेच नागरिकांनी ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ मोहिमेत सहभागी होऊन मोफत AI मास्टरक्लासचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी देवेंद्र गावडे व कु.करोल आली उपस्थित होते.

error: Content is protected !!