
आंबोलीच्या निसर्गरम्य घाटात धावण्याची संधी; मान्सून मॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू
फिटनेस, पर्यावरण जनजागृती आणि पर्यटनाला चालना; तिसऱ्या वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉन
कुडाळ : प्रतिनिधी
सह्याद्रि अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली- सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनचे 2 ऑगस्ट 2026 रोजी आंबोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचे तिसरे वर्ष आहे. आंबोली मान्सुन मॅराथॉन 21 कि.मी., 10 कि.मी. व 5 कि.मी. मध्ये हि मॅरेथॉन होणार असल्याचे कुडाळ येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत गजानन कांदळगावकर व मायकेल डिसूझा यांनी दिली.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेला गजानन कांदळगावकर, यावेळी सह्याद्रि अॅडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोलीचे मायकेल डीसूझा, संदेश गोसावी संतोष पालेकर, नारायण चव्हाण, राजू राऊळ, विशाल बांदेकर, सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, प्रथमेश सावंत, बापू परब, बाबा पोरे, सचिन मदने, आदी उपस्थित होते.
माहीती देताना गजानन कांदळगावकर म्हणाले, सह्याद्री अॅडव्हेंचर अॅण्ड रेस्क्यू ग्रुप आंबोली- सांगेली या संस्थेमार्फत आमचे अध्यक्ष बाबल आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली ३० ते ३५ वर्षे आंबोली घाट परिसर, जिल्ह्यातील सर्वत्र डोंगराळ भाग तसेच पाण्यातील आपत्कालीन बचाव (रेस्क्यू) चे कार्य विनामोबदला करत आहोत. तसेच इतर विविध सामाजिक कार्यामध्येही आमच्या संस्थेचा सहभाग असतो. या कार्याचाच एक भाग म्हणून सह्याद्री अॅडव्हेंचर अॅण्ड रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेली व सायकलीस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ०२ ऑगस्ट २०२६ रोजी आंबोली येथे “आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६” स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून फिटनेस व आरोग्य तसेच पर्यावरण व जैवविविधता विषयक जनजागृती करणे तथा पर्यटन वृद्धी व जागरूकता हा उद्देश आहे. महाराष्ट्र, गोव्यासह मोठ्या शहरातील धावपटू सहभागी होणार आहेत. नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन भव्यदिव्य होईल असा विश्वास गजानन कांदळगावकर यांनी व्यक्त केला.
मॅरेथॉनचे मार्ग
5 किमी साठी आंबोली चेकपोस्ट ते शिरगावकर सनसेट पाईंट, 10 किमी साठी आंबोली चेकपोस्ट ते नेणेवाडी, 21 किमी आंबोली चेकपोस्ट ते चौकुळ तोरपवाडी असा असणार आहे.
आकर्षक बक्षिसे
21 किमी – प्रथम रोख 20 हजार व चषक, द्वितीय रोख 15 हजार व चषक, 10 किमी – प्रथम – 10 हजार व चषक, द्वितीय 7 हजार व चषक, 5 किमी – सर्वांना मेडल व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
वयोगट
35 ते 45 वयोगट पुरुष-महिला, 45 ते 60 वयोगट पुरूष – महिला, वयोगट 60 वर्षावरील पुरुष-महिला असं असणार आहे.या स्पर्धेत सिंधुदुर्ग तथा संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तथा इतरही राज्यांमधून धावपटू सहभागी होणार आहेत. सहभागी धावपटूंना टी-शर्ट, आकर्षक मेडल व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ठीक ७ वाजता उद्घाटन व फ्लॅग ऑफ होऊन स्पर्धेला सुरुवात होईल. सकाळी ठीक ९ वाजता धावपटूंना मेडल व प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल. तरी या स्पर्धेसाठी सर्व धावपटूंनी आपला सहभाग नोंदवावा आणि आंबोलीच्या गार हवेत, रिमझिम पावसात, शुभ्र धुक्याच्या चादरीत, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून धावण्याचा मनमुराद आनंद लुटावा. तसेच निसर्गप्रेमी, पर्यटक, व नागरिकांनीही या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्हयातील जास्तीत जास्त धावपटूंनी या आंबोली मान्सून मॅराथान मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.









