
मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील देवबाग येथील नरेंद्र आनंद बांदेकर (वय ३५) या तरुणाने घराच्या मागील रिसॉर्टच्या मीटर रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आल्याची माहीती मालवण पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
नरेंद्र आनंद बांदेकर हा पदवीधर शिक्षित होता. तसेच त्याने एमपीएससीची परीक्षाही दिली होती. तो चांगल्या नोकरीच्या शोधात होता. नरेंद्र हा त्याच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या रिसॉर्टच्या मीटर रूम मध्ये रोज रात्री झोपायला जायचा. काल रात्री १२ वाजेपर्यंत मुलांसोबत कॅरम खेळल्यावर तो मीटर रूममध्ये झोपी गेला होता. आज सकाळी तो बराच वेळ रूम मधून बाहेर न आल्याने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याचे काका रिसॉर्टच्या मीटर रूम मध्ये बघण्यासाठी गेले असता त्यांना नरेंद्र याचा मृतदेह रूमच्या छप्पराला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर मालवण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. याबाबत अधिक तपास पोलीस जितेंद्र पेडणेकर हे करत आहेत. नरेंद्र याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.नरेंद्र हा देवबाग येथील बुवा आनंद बांदेकर यांचा मुलगा होता.









