ठळक घडामोडी

करूळ घाटात दरड कोसळली; कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!

आज मृतदेह सापडला; आकेरीतील घटना

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही संततधार पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात कायम आहे. तळेरे–गगनबावडा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी वरील करूळ घाटात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. तर दुसरीकडे कुडाळ तालुक्यातील आकेरी गावातील शेतकरी गणेश पुंडलिक पालव यांचा ओहोळात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
      राष्ट्रीय महामार्ग विभाग, खारेपाटण यांनी दिलेल्या माहितीनुसार, करूळ घाटातील साखळी क्रमांक २९+३०० येथे शुक्रवारी (३ जुलै) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एका बाजूस कोसळलेला मलबा  हटवून संबंधित ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तेथे रस्त्यावर वाहतुकीस निर्माण झालेला अडथळा दूर करून मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती विभागाने दिली आहे.
     दरम्यान, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि ओहोळ्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याच पावसामुळे कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे दुर्दैवी घटना घडली. कुडाळ तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आकेरी गावातील गणेश पुंडलिक पालव हे गुरुवारी (काल २ जुलै) गुरे चारण्यासाठी गेले असता शेतातील वहाळीत पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू असताना आज (३ जुलै) सकाळी सुमारे ९ वाजता त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे आकेरी गावात हळहळ व्यक्त होत असून पालव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी, नाले, ओढे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!