
५ वर्षांत ढोबळ नफ्यात विक्रमी वाढ, २७ कोटींवरून थेट १४९ कोटींवर झेप
आयबीपीएस मार्फत झालेली नोकरभरती पूर्णपणे पारदर्शक – अध्यक्ष मनीष दळवी
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मागच्या पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सभासदांनी जी विश्वासाची जबाबदारी या विद्यमान संचालक मंडळाच्या खांद्यावर दिली होती, ती आम्ही अत्यंत यशस्वी आणि प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. याचेच फलित म्हणून आज संस्थेच्या आणि बँकेच्या सर्व सभासदांना त्यांच्या असलेल्या भागाच्या रकमेवर १३% लाभांश आणि अतिरिक्त अर्धा टक्का इन्सेन्टिव्ह असा एकूण साडेतेरा टक्के थेट बेनिफिट जाहीर करण्यात आला आहे. हा फायदा प्रत्येक सहकारी संस्थेला तिच्या भागांच्या रकमेनुसार मिळणार आहे. याच धर्तीवर, बँकेच्या अहोरात्र कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल २०% बोनस देण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. या वार्षिक सभेमध्ये बँकेच्या एकूणच वार्षिक अहवालावर आणि भावी वाटचालीवर सखोल व सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेसमोर ठेवण्यात आलेले सर्व विषय सभासदांनी टाळ्यांच्या गजरात आणि एकमुखाने मंजूर केले. या यशस्वी सभेनंतर आयोजित सविस्तर पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी बँकेच्या प्रगतीचा ताळेबंद जाहीर केला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आणि संचालक मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
नफा आणि व्यवसायात दुपटीने वाढ..!
श्री. दळवी म्हणाले की,बँकेचा एकूण कारभार दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. ३१ मार्च २०२६ अखेर जिल्हा बँकेने ७,१७६ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच बँकेने आजघडीला जवळपास ७,५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या यशाच्या जोरावर आगामी ३१ मार्च २०२८ पर्यंत जिल्हा बँकेला तब्बल १०,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे भव्य उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ती सर्व ठोस पावले संचालक व व्यवस्थापन मंडळ उचलणार आहे.गत पाच वर्षांपूर्वी बँकेचा ढोबळ नफा अवघा २७ कोटी रुपये होता, तो आज संचालक मंडळाच्या योग्य नियोजनामुळे जवळपास १४९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच व्यवसायामध्ये ४,२७७ कोटी रुपयांवरून आज बँक ७,५०० कोटींच्या पुढे गेली आहे. निधी, ठेवी, गुंतवणूक, ढोबळ आणि निव्वळ नफा अशा प्रत्येक परिमाणात बँकेने अवघ्या पाच वर्षांत दुपटीचा आकडा गाठला आहे. जिल्ह्यातील विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जिल्हा बँकेकडून थेट कर्ज घेताना जे व्याज आकारले जाते, त्यापेक्षा १% कमी व्याज विकास सहकारी संस्थांमार्फत कर्ज घेतल्यास आकारले जाईल. हा फायदा थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. पात्र सभासद शेतकऱ्यांना त्यांच्या शेती, पूरक व्यवसाय किंवा वैयक्तिक व घरगुती कामकाजासाठी विकास सहकारी संस्थांमार्फत ५ लाख रुपयांपर्यंतचे ‘कन्झम्प्शन लोन’ अत्यंत सवलतीच्या आणि कमी व्याजदरात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यातील विकास सहकारी संस्था, पतसंस्था, मच्छीमार सहकारी संस्था, दुग्ध सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था आणि औद्योगिक सहकारी संस्थांचा व्यवसाय वाढवण्यासाठी जिल्हा बँक आर्थिक व तांत्रिक पातळीवर खंबीरपणे पावले उचलत आहे.
७३ जागांची नोकरभरती पूर्णपणे पारदर्शक
बँकेतील ७३ जागांची नोकरभरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, ती आयबीपीएस या देशातील सर्वोच्च व नामांकित संस्थेमार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. याची गुणवत्ता यादी पुढील २ ते ३ दिवसांत बँकेच्या संकेतस्थळावर व नोटीस बोर्डावर लागेल. यात कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर हस्तक्षेप झालेला नाही.
६७ नवीन जागांची भरती व चतुर्थ श्रेणी नोकरभरती
येत्या दोन दिवसांत आणखी ६७ नवीन जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातील शासन निर्णय प्राप्त झाला असून, ही प्रक्रियाही एका महिन्यात पूर्ण केली जाईल. यामुळे जिल्ह्यातील गुणवंत तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची सुवर्णसंधी मिळणार आहे.
विरोधकांचे मनसुबे धुळीस..!
पत्रकारांनी विरोधकांच्या आरोपांबाबत विचारले असता अध्यक्ष मनीष दळवी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, विरोधक केवळ सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रापुरते मर्यादित आहेत. आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ ६ ते ७ विरोधक उपस्थित होते. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक विषयाला कायद्याच्या चौकटीत राहून आणि पुराव्यानिशी चोख उत्तर देण्यात आले असल्याचे सांगितले.
डिजिटल बँकिंगमध्ये जिल्हा बँक राज्यात एक नंबर राहणार
बँकिंग क्षेत्रात सध्या तीव्र स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धात्मक युगात आपली जिल्हा बँक कुठेही मागे पडणार नाही. पुढील काळात डिजिटल बँकिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.या संपूर्ण यशस्वी वाटचालीत माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, मार्गदर्शक पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री आ.दीपक केसरकर आणि आ.निलेश राणे यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.









