
सागरी सुरक्षेचा संदेश देणारी ‘लाट’ १२ जुलैला प्रदर्शित होणार
सिंधुदुर्ग पोलिस आणि साई जळवी फिल्म्सचा जनजागृतीपर उपक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग पोलीस आणि साई जळवी फिल्म्सच्या माध्यमातून सागरी सुरक्षा या विषयावर निर्मिती होत असलेल्या लाट या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच कुडाळ येथे मराठी हिंदी सिनेमा सृष्टीतील सुपरस्टार अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या या जनजागृती उपक्रमाला अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी भरभरून शुभेच्छा देत संपूर्ण सिंधुदुर्ग पोलीस दलाचे तोंडभरून कौतुक केले. आपल्याला खर तर पोलीस व्हायचं होत आणि तशी तयारी देखील सुरू होती पण कला क्षेत्राकडे जास्त कल असल्यामुळे पोलीस होण्याच स्वप्न अपूरच राहील पण अश्या कोणत्याही उपक्रमात आपली केव्हाही मदत लागली तर हक्काने बोलवा आपण नक्की उपस्थित राहू अस त्यांनी आवाहन देत साई जळवी यांना सुद्धा या शॉर्ट फिल्मसाठी शुभेच्छा दिल्या. या पोस्टर अनावरण सोहळ्याला अभिनेता सिद्धार्थ जाधव, दिग्दर्शक, फिल्म लाईन प्रोड्यूसर साईनाथ जळवी, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, अभिनेता अभय नेवगी, अभिनेता अमर प्रभू, अभिनेत्री रुचिता शिर्के, उद्योजक राकेश म्हाडदळकर आदी कलाकार उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुमारे १२१ किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्री सुरक्षेसाठी (सागरी सुरक्षा) जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाने स्थानिक पातळीवर जीवरक्षक दल, सागरी पोलिस ठाणी आणि कोस्ट गार्डची मदत तैनात केली आहे त्याच बरोबर नागरिकांनी सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कशी ? हे या लाट शॉर्ट फिल्म मधून दाखविण्यात आले आहे. आजकालच्या नागरिकांना चलचित्र भाषा जास्त आवडते याच दृष्टिकोनातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्या संकल्पनेतून या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली गेली असून या फिल्मचे दिग्दर्शनाची जबाबदारी साईनाथ जळवी यांनी सांभाळली आहे. साई जळवी यांनी या अगोदर सिंधुदुर्ग पोलिसांच्या माध्यमातून अमली पदार्थ व्यसनाधीनता कमी करण्याच्या दृष्टीने “खोड”, फ्रॉड कॉल वर आधारित “पुंजी”, नागरिकांच्या मदतीसाठी लागणारा कॉल वर आधारित “Anytime 112” अश्या एकूण ३ शॉर्ट फिल्म नागरिकांसाठी बनवल्या आहेत. त्या शॉर्ट फिल्म वेगवेगळ्या शाळा, कॉलेज आणि गावागावांमधील नागरिकांना दाखवून जनजागृती करण्यात आली होती त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा ही झाल्याचे जळवी यांनी सांगितले.
गेली २१ वर्ष कोकणातील कलाकारांसाठी अभिनय शिबिरांचे आयोजन करून त्या कलाकारांना सिने – मालिका क्षेत्रात व्यासपीठ मिळवून देणारे साईनाथ जळवी यांनी आतापर्यंत ६५ मराठी आणि हिंदी सिनेमे केले असून साई जळवी फिल्म्स आयोजित करत असलेल्या अभिनय प्रशिक्षण शिबिर मधील कलाकारांनी ह्या शॉर्ट फिल्म मध्ये काम केले आहे. लाट ह्या शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिका आर्या सौदागर आणि भक्ती राणे यांनी साकारल्या असून अभिनेता अभय नेवगी, अभिनेत्री नमिता गावकर, संजय बागवे, पंकज गवस, मनोहर धुरी, शमिका जोईल, वेदिका ताम्हणकर, दीक्षा उगारे, भूमिका जाधव, तत्परा चौधरी, चौधरी, साईल सातार्डेकर, केसर वाणिवडेकर हे कलाकार सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या शॉर्ट फिल्मचे कथा आणि दिग्दर्शक साईनाथ जळवी, छायाचित्रण प्रथमेश धुरी, ड्रोन चित्रण ललित परब, संकलन दिनार पावसकर, पोस्टर डिझाईन कॅप्चरकर स्टूडियो, प्रोडक्शन मनोहर धुरी, पंकज गवस, स्थिरचित्रण विनय गायकवाड यांनी सांभाळलं आहे. या शॉर्ट फिल्म चित्रीकरण दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी प्रवीण कोल्हे, सागरी सुरक्षा शाखा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, निवती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भीमसेन गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. येत्या १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ही शॉर्ट फिल्म Sai Jalvi Films यू ट्यूब चॅनेल आणि सिंधुदुर्ग पोलीस फेसबुक पेज वर प्रदर्शित केली जाणार आहे तरी आपण सर्वांनी लाट ही शॉर्ट फिल्म नक्की पहा असे आवाहन साईनाथ जळवी यांनी केले आहे.









