
अतिवृष्टीचा फटका; संरक्षक भिंतीची ग्रामस्थांची मागणी
पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार; अमोल तेली यांची माहिती
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील घोडगे मळेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर नजिकच्या रस्त्यालगतचा मातीचा भराव खचून अतिवृष्टीत वाहून गेल्याने रस्त्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी त्या आधी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले आहे. घोटगे मळेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर नजिकच्या रस्त्याचा भराव तेथील ओहोळाच्या पाण्याने खचला. रस्त्यालगतच्या मातीचा भराव काही प्रमाणात वाहून गेल्याने तेथे रस्त्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तेथे रस्त्यालगत ओहोळाचे पात्र असून मुसळधार पावसात ओहोळाच्या पाण्याचा प्रवाह रस्त्यालगत वाहत असतो. त्यामुळे तेथे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. दरम्यान माजी सरपंच अमोल तेली व सुधीर नाईक यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच माजी जि.प.सदस्य लाॅरेन्स मान्येकर व आपण पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून सदर ठिकाणी संरक्षक भिंतीची मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी अमोल तेली यांनी सांगितले.









