ठळक घडामोडी

कुडाळमधील गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास; गणेश चतुर्थीपूर्वी होणार लोकार्पण!

नगरसेविका नयना मांजरेकर यांची माहीती; यंदा गणेश विसर्जन होणार सुलभ

गणेश घाटाबाबत कोणी अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच नाही; नगरसेविका नयना मांजरेकर

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या भंगसाळ नदीकिनारील गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास आले असून घाट परिसरातील सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी गणेश घाटाचे लोकार्पण करण्याचे न.पं.चे नियोजन असून त्यानुसार कामाला गती देण्यात येत आहे. त्यानुसार जलदगतीने ठेकेदाराकडून काम करून घेतले जात आहे. त्यामुळे मुळात योजलेल्या व योग्य पद्धतीने पूर्णत्वास जात असलेल्या कामाबाबत कोणी अल्टीमेटम अथवा इशारा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सत्ताधारी नगरसेविका सौ.नयना मांजरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
       कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत शिवसेना शहर प्रमुख तथा सत्ताधारी नगरसेवक अभिषेक गावडे यांनी गणेश घाट सुशोभीकरणाचे काम दिनांक १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण न झाल्यास कुडाळ नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला होता. त्यानंतर सत्ताधारी नगरसेविका सौ.नयना मांजरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास आले असल्याचे स्पष्ट केले आहे. नगरपंचायतीत शिवसेना – भाजप महायुतीची सत्ता असून, गणेश घाट बांधकामावरून सत्ताधाऱ्यांतच राजकीय चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
    सौ.नयना मांजरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी या गणेश घाट बांधकाम करणे या प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडले. त्यांनतर भंगसाळ नदीच्या पाण्याची पातळी साधारण नोव्हेंबर २०२५ अखेर खाली गेल्यांनतर प्रत्यक्ष कामास सुरवात ठेकेदारामार्फत करण्यात आली. धरण कक्ष पाटबंधारे, उपविभाग सावंतवाडी यांच्याकडून संभाव्य पाणी टंचाई नियोजनाच्या दृष्टीने बंधा-यावर प्लेट्स घातल्या गेल्याने संरक्षक भिंतीचे बांधकाम करताना पाण्यामुळे कामाची अपेक्षीत गती राखण्यास मर्यादा येत होत्या. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून, नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व स्थानिक नगरसेविका म्हणून माझ्याकडून सातत्याने या कामाचा पाठपुरावा व स्थळ तपासणी केली जात असून कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले गेलेत. सद्यस्थितीत नगर पंचायतीकडील मंजूर गणेश घाटाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. गणेशघाटाच्या सभोवती सुरु असलेले सुशोभिकरणाचे काम हे पर्यटन विभागाअंतर्गत सुरु असून याबाबत देखील पर्यटन विभागाशी समन्वय ठेवून सुशोभिकरणाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना गराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर, कुडाळ नगरपंचायत यांनी सबंधितांना स्थळ पहाणी दरम्यान दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
      नयना मांजरेकर पुढे म्हणाल्या, गणेश घाट सुशोभीकरणाचे काम हे अत्यंत महत्त्वाचे व तांत्रिकदृष्ट्या जटिल स्वरूपाचे आहे. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा याला प्राधान्य देऊनच नगरपंचायत प्रशासन काम करत आहे. सदर कामाच्या प्रगतीवर नगरपंचायतीचे सातत्याने लक्ष असून संबंधित ठेकेदारास वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. मी या भागातील स्थानिक रहिवासी तसेच नगरसेविका असल्याने वर्षांनुवर्षे आमच्या तसेच बहुतांश कुडाळ वासियांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन येथे केले जात असून या कामासाठी मी, स्थानिक नगरसेविका म्हणून अधिक जागरूक व दक्ष आहे. तरी अशा प्रकल्पासाठी सर्वांनी एकत्र येऊन समस्यांचे समाधान शोधणे आवश्यक आहे. कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार आहे. पर्यटन विभागाकडे असलेले घाटाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण करून गणेश चतुर्थीपूर्वी लोकार्पण करण्याचे यापूर्वीच नियोजित आहे. त्यानुसार जलदगतीने ठेकेदाराकडून काम करून घेतले जात आहे. त्यामुळे मुळात योजलेल्या व योग्य पद्धतीने पूर्णत्वास जात असलेल्या कामाबाबत कोणी अल्टीमेटम अथवा इशारा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. नगराध्यक्ष व कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने येत्या गणेश चतुर्थीमध्ये गणेश घाट कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल, असा विश्वास सौ.मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!