
कोकणात अणुऊर्जा प्रकल्प होणार नसल्याची स्पष्ट घोषणा करावी
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
देवगड तालुक्यात काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसी या कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट करतानाच प्रकल्पासाठी अद्याप जागा निश्चित नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा म्हणजे “ताकाला जाऊन भांड लपवण्याचा प्रकार” असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोकणच्या पर्यावरणाला धोका निर्माण करणारा कोणताही प्रकल्प प्रस्तावित नसल्याचे सांगितले होते.
मात्र, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसी या कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी प्रकल्पासाठी जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या मनातील संभ्रम अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील कोणत्याही जिल्ह्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा करून घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.









